जागतिक पर्यटन दिनाच्या पूर्वसंध्येला मंत्री रोहन खंवटे यांचे प्रतिपादन : ’पिपल, प्लॅनेट अँड प्रॉस्पेरिटी’ यंदाची संकल्पना
पणजी : राज्यात पर्यटनक्षेत्रात यापुढे स्थानिक लोकांचेही हितसंबंध जपताना त्यांच्याही आर्थिक उत्कर्षास बळकटी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी पर्यटनाच्या महत्त्वावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली. आज दि. 27 रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या जागतिक पर्यटन दिनाच्या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी मंगळवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पर्यटन संचालक सुनील अंचिपाका यांचीही त्यावेळी उपस्थिती होती. यंदाचा पर्यटन दिन ‘पिपल, प्लॅनेट अँड प्रॉस्पेरिटी’ या संकल्पनेवर आधारित असेल असे ते म्हणाले. गोवा ट्रॅव्हल टुरिझम संघटना, एसकेएएल यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा हा दिन साजरा करण्यात येणार असून दोनापावला येथील ताज सिदादे गोवा होरायझॉन हॉटेलमध्ये सदर कार्यक्रम होणार आहे.
पर्यावरणाचे रक्षण करण्यावर भर
पुढे बोलताना खंवटे यांनी, पर्यावरणावरील नकारात्मक प्रभाव कमी करण्यावर आणि स्थानिक जनतेला पाठिंबा देण्यावर हरित पर्यटन लक्ष केंद्रित करत असल्याचे सांगितले. भावी पिढ्यांसाठी नैसर्गिक संसाधने जतन करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. हरित पर्यटनाचा एक पैलू म्हणजे तंबू आणि इको कॉटेजचा प्रचार. पर्यटन हा एक असा उद्योग आहे जो साहसी आणि मौजमजेला प्रोत्साहन देतो आणि भावी पिढ्यांसाठी पर्यावरणाचे रक्षण करण्यावर भर देतो, अशी माहिती त्यांनी दिली.
स्थानिकांच्या उत्कर्षास बळकटी
आज जेव्हा संपूर्ण जग पर्यटनावर अवलंबून आहे तेव्हा यंदाचा पर्यटन दिवस पर्यटन आणि ग्रीन इन्व्हेस्टमेंटस् यांच्यावर आधारित ठेवण्यात आला आहे. त्याद्वारे अन्य चार खांबांना बळ देण्यात येणार आहे. ग्रीन टुरिझम हा शब्द नवा असून त्याद्वारे साहसी पर्यटनाला चालना देण्याचे प्रयत्न होणार आहेत. यात स्थानिक लोकांचेही हितसंबंध जपताना त्यांच्याही आर्थिक उत्कर्षास बळकटी देण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. पर्यटनाच्या दृष्टीने साधनसुविधा निर्माण करताना शाश्वत विकासावर जास्त भर देण्यात येणार असून याही पुढे अन्य आव्हानांचा सामना करावा लागणार आहे, असे खंवटे म्हणाले. गोवा म्हटले की सर्वात आधी नजरेसमोर येतात ते येथील फेसाळणारे समुद्रकिनारे. परंतु यापुढे तेवढ्यावरच अवलंबून न राहता ग्रामीण आणि अंतर्गत पर्यटनाचाही विचार होणार आहे. त्या दृष्टीने पर्यटन खात्याने सर्वतोपरी प्रयत्न चालविले असून त्याचाच भाग म्हणून राज्यातील चिखलकाला यासारखे महोत्सव सुद्धा राज्यस्तरावर साजरे करण्यास प्रारंभ केला आहे. या सर्वांचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने 75 महाविद्यालयांचा समावेश असलेला टुरिझम क्लब जैवविविधता संवर्धनाला मदत करतो आणि जबाबदार पर्यटन पद्धतींना प्रोत्साहन देतो, असे खंवटे म्हणाले. अंचिपाका यांनी बोलताना, राज्यातील पर्यटन वाढ आणि विकासाला चालना देण्यासाठी सरकार विविध संधींचा सक्रियपणे शोध घेत आहे. तसेच सर्वांगीण प्रगतीला हातभार लावण्याची क्षमता असलेली नवीन क्षेत्रे ओळखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले.