सहा राज्यांमध्ये 51 स्थानांवर एनआयएचे छापे, कागदपत्रे, साधने हस्तगत
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
खलिस्तानवाद्यांची पाळेमुळे खणून काढण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय गुन्हा अन्वेषण प्राधिकरणाने (एनआयए) जोरदार धाडसत्र चालविले आहे. याच अभियानाचा भाग म्हणून बुधवारी 6 राज्यांमधील 51 स्थानांवर छापे घालण्यात आले आहेत. त्यांमध्ये अनेक महत्वाची कागदपत्रे आणि साधने हस्तगत करण्यात आली.
खलिस्तानवादी आणि गुंडप्रवृत्तीच्या शक्ती यांच्यातील संबंध तोडण्याच्या दृष्टीने हे धाडसत्र महत्वाचे असल्याची माहिती देण्यात आली. कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई, बंबिला आणि अर्शदीप डल्ला यांच्याशीं संबंधित ठिकाणांची या धाडसत्रात झडती घेण्यात आली. खलिस्तानवाद्यांशी संबंधित गुंड अर्शदीप सिंग याने एका मद्यवितकराकडे खंडणी मागितल्याचे प्रकरण समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईत 100 हून अधिक अधिकाऱ्यांचा समावेश होता.
सहा राज्यांचा समावेश
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, दिल्ली, पंजाब आणि हरियाणा या राज्यांमधील अनेक स्थानी या धाडी घालण्यात आल्या. धाडसत्राची योजना बनविण्याआधी एनआयएने दहशतवाद्यांशी संबंधित गुंड आणि त्यांच्या टोळ्यांची सूची बनविली होती. लॉरेन्स बिष्णोई, जसदीपसिंग, काला जठेरी ऊर्फ संदीप, विरेंदर प्रताप ऊर्फ काला राणा आणि जोगिंदरसिंग या कुख्यात गुंडांच्या ठिकाणांना तसेच त्यांच्या साहाय्यकांच्या स्थानांना लक्ष्य करण्यात आले. यातील काही गुंड सध्या कॅनडात वास्तव्याला आहेत. उत्तराखंडमधील उधमसिंग नगर परिसरात अनेक धाडी टाकण्यात आल्या. या गुंडांच्या मालमत्ता, भूखंड आणि लपण्याच्या जागांची माहिती आधी मिळविण्यात आली होती, अशी माहिती देण्यात आली आहे.
चंदीगड आणि अमृतसरवर लक्ष
सर्व हिंदूंनी कॅनडातून निघून जावे, अशी धमकी देणारा खलिस्तानी दहशतवादी गुरुपतवंतसिंग पन्नू याच्या अनेक मालमत्ता चंदीगड आणि अमृतसर येथे काही दिवसांपूर्वी जप्त करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे पंजाबमधील 1,000 हून अधिक स्थानी धाडी टाकून खलिस्तानवादी गोल्डी बरार याची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. बरार हा पोलिसांना अनेक गुन्ह्यात हवा आहे. कॅनडात काही दिवसांपूर्वी सुखा दुनिके या गुंडाची हत्या करण्यात आली होती. या हत्येत बरार याचा हात असल्याची माहिती मिळाल्यावरुन ही कारवाई करण्यात आली.
साखळी तोडण्याचे उद्दिष्ट
दहशतवादी आणि खलिस्तानवाद्यांचे सहानुभूतीदार तसेच समर्थक यांच्यातील संबंधांची साखळी तोडण्यासाठी एनआयए प्रयत्नशील आहे. अनेक दहशतवादी कॅनडात रहात आहेत. मात्र, त्यांच्या मालमत्ता आणि कार्यालये भारतात, विशेषत: पंजाबमध्ये आहेत. 2018 मध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी पंजाबला भेट दिली होती. त्यावेळी भारत सरकारने त्यांना कॅनडातून भारतविरोधी कृत्ये करणाऱ्या अनेक दहशतवाद्यांची आणि गुंडांची सूची दिली होती. त्यांच्याविरोधात कॅनडाने कोणतीही कारवाई केलेली नाही, असे भारताने स्पष्ट केले आहे.