शिक्षण खात्याकडून सहामाही परीक्षेचे वेळापत्रक जाहीर : पहिली ते बारावीची 9 ते 18 ऑक्टोबर या दरम्यान होणार परीक्षा,शिक्षण खात्याने कल्पकतेने केले वेळापत्रक तयार
पणजी : यंदा प्रथमच गोव्यात 37 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार असल्याने गोव्याची मान अभिमानाने उंचावली आहे. राज्यातील विद्यार्थ्यांनाही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा अनुभव आणि आनंद घेता यावा, यासाठी शिक्षण खात्याने सहामाही परीक्षेचे वेळापत्रक कल्पकतेने तयार केले आहे. सहामाही परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांनाही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी नेण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी ‘तऊण भारतशी’ बोलताना दिली. संचालक झिंगडे यांनी सांगितले की, राज्यातील शाळांतील विद्यार्थ्यांसाठी सहामाही परीक्षांचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून, 9 ऑक्टोबर रोजी परीक्षेला सुरुवात होणार असून, 18 ऑक्टोबर रोजी ही सहामाही परीक्षा संपणार आहे. राज्यात क्रीडा स्पर्धा होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर व शाळांवर परिणाम होऊ नये, यादृष्टीने हे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासालाही वाव मिळेल, शिवाय परीक्षाही कोणतेही विघ्न न येता पार पडणार आहेत.
गणेशचतुर्थीनिमित्त शाळांना दिलेली सुटी संपताच सहामाही परीक्षेच्या तयारीसाठी आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी राज्यातील शाळांना शिक्षण खात्याने योग्य त्या सूचना केलेल्या आहेत. राज्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत असल्यातरी त्याचा परीक्षांवर परिणाम होऊ नये, याकडेही शिक्षण खात्याने विशेष लक्ष दिले आहे. राज्यात 25 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या दरम्यान राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर क्रीडा खात्याने आतापासूनच या स्पर्धेची जय्यत तयारी सुरू केलेली आहे. सध्या गणेशोत्सवाची धामधूम असल्याने गणेशोत्सव साजरा होताच क्रीडा स्पर्धेचे वातावरण निर्मिती होईल. अनेक राज्यातील खेळाडू गोव्यात येणार असल्याने क्रीडा खात्यानेही त्यांच्या सुरक्षेचा उपाय आणि त्यादृष्टीने तयारीला सुरवात केली आहे.
विद्यार्थ्यांसाठी खास नियोजन
25 ऑक्टोबरपासून राज्यात सुरू होणाऱ्या क्रीडा स्पर्धेचा आनंद लुटण्याची सुवर्णसंधी विद्यार्थ्यांनाही प्राप्त व्हावी, यासाठी शिक्षण खात्याने खास वेळापत्रक तयार केले आहे. आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या ठिकाणी नेण्यात येणार आहे. शिवाय पहिली ते पाचवी व पाचवी ते आठवी या इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठीही नियोजन केले जाणार आहे, असे शिक्षण खात्याने सांगितले.
22 दिवस मिळणार दिवाळीची सुट्टी
राज्यातील शाळांना 22 दिवस दिवाळीची सुट्टी मिळणार आहे. दिवाळी सुट्टीचेही वेळापत्रक शिक्षण खात्याने केले आहे. 12 नोव्हेंबरपासून दिवाळी सुरू होणार असल्याने 8 नोव्हेंबरपासून शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी दिली.