अंतिम फेरीत यू-17 चंदिगड संघांवर एकमेव गोलने मात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
42 वर्षांनंतर नागालँडच्या मुलांच्या हायस्कूल संघाने 61 व्या सुब्रोतो चषक यू-17 फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले. जादा वेळेतील पूर्वार्धात सेतुंगचिमने हेडरवर नोंदवलेला एकमेव गोल नागालँडला जेतेपद मिळवून देणारा ठरला.
या सामन्यात नागालँड संघानेच पूर्ण वर्चस्व राखले होते. पिलग्रिम हायर सेकंडरी स्कूल दिमापूर, नागालँड (पीएचएसएस) संघाने अंतिम फेरीत सरकारी मॉडेल हायर सेकंडरी स्कूल चंदिगड संघाचा एकमेव गोलने पराभव करून हा आंतरराष्ट्रीय फुटबॉल चषक पटकावला. नागालँडच्या पीएचएसएस संघाला एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी यांच्याहस्ते चषक प्रदान करण्यात आला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य मिळविलेला मल्ल रवी दहियादेखील यावेळी उपस्थित होता.
सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांनी गोलसाठी प्रयत्न केले. नागालँड संघाने या सत्रात वर्चस्व राखले असले तरी त्यांना गोल नोंदवता आला नाही. उत्तरार्धातही दोन्ही संघांना गोलच्या संधी निर्माण करता आल्या नाहीत. त्यामुळे जादा वेळ देण्यात आला. त्यातील पूर्वार्धात टाँगटिनलेनच्या कॉर्नरला सेतुंगचिमने उंच उडी घेत हेडरने चेंडूला गोलजाळय़ाची अचूक दिशा दिली. हाच गोल शेवटी निर्णायक ठरला. सेतुंगचिमने उपांत्य फेरीत हॅट्ट्रिक नोंदवली होती.
6 सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात झाली होती. प्रथम यू-14 मुलांची स्पर्धा झाली, त्यात मणिपूरच्या हेरोक एचएसने जेतेपद मिळविले. त्यानंतर 27 सप्टेंबर रोजी मुलींच्या यू-17 स्पर्धेत जुमला झारखंडच्या सेंट पॅट्रिक्स संघाने जेतेपद पटकावले. यू-14 मुले, यू-17 मुले व यू-17 मुली या तीन स्पर्धांत देशभरातील एकूण 92 शालेय संघांनी भाग घेतला होता. त्यात बांगलादेशच्या संघाचाही समावेश होता.
विजेत्यांना 3.5 लाख तर उपविजेत्यांना 2 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. उपांत्य व उपांत्यपूर्व फेरी गाठलेल्या संघांना अनुक्रमे 1.5 व एक लाख रुपये देण्यात आले. फेअरप्ले ट्रॉफी जिंकलेल्या संघाला 50,000 तर सर्वोत्तम खेळाडू व सर्वोत्तम शालेय संघाला प्रत्येकी 40000 रुपये आणि सर्वोत्तम गोलरक्षक व सर्वोत्तम प्रशिक्षक यांना प्रत्येकी 25000 रुपये देण्यात आले.