ऑनलाईन टीम / पुणे :
खतांच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने यावर्षी 1 लाख 30 हजार कोटी रुपयांची सबसिडी दिली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.
विधानसभेत बोगस बियाणं आणि खतांचा मुद्दा प्रश्नोत्तरामध्ये काँग्रेस आमदारांकडून मांडण्यात आला. त्यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रश्नांना उत्तरे दिली. बोगस बियाणे आणि खतांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे काम कृषी विभागाने सुरू केले आहे. 164 मेट्रीक टन बोगस बियाणे जप्त करण्यात आले आहे. 20 विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. 105 विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. बोगस बियाणे प्रकरणी 22 जणांवर केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. तर गुणनियंत्रण विभागाने 190 टन बोगस खतांचा साठा जप्त केला आहे. यासंदर्भात देखील 13 केसेस दाखल करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, खतांच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने यावर्षी 1 लाख 30 हजार कोटी रुपयांची सबसिडी दिली आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितल्याप्रमाणे अधिवेशन संपायच्या आत बोगस बियाणे आणि खते विकणांसाठी कडक कायदा आणला जाईल असेही अजित पवार म्हणाले.