बीसीसीआयचे सचिव जय शहा यांची माहिती : वागातोर आमसभेत अनेक महत्वपूर्ण निर्णय
मडगाव : गोव्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम असावे ही काळाची गरज आहे. आपल्या राज्यात भव्य क्रिकेट स्टेडियम असावे ही सर्व क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे. त्यामुळे गोव्यात वन म्हावळींगे येथे भव्य आंतरराष्ट्रीय स्टेडियम व्हायला हवे. गोवा क्रिकेट संघटनेला या स्टेडियमच्या निर्मितीसाठी आवश्यक ती सर्व मदत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) करणार असल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली. बीसीसीआयची आमसभा वागातोर येथील ‘डब्लू गोवा’ या तारांकीत हॉटेलात झाली. यावेळी विविध राज्य क्रिकेट संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. गोवा क्रिकेट संघटनेचे मानद सचिव रोहन गावस देसाई यांनी आमसभेत गोव्याचे प्रतिनिधीत्व केले.
भरीव आर्थिक अनुदान
रोहन गावस देसाई हे तर गोव्यातील आमच्या दौऱ्यात फक्त स्टेडियमविषयीच बोलले. केवळ इथेच नव्हे तर ते आमच्या प्रत्येक बैठकीत फक्त स्टेडियमचाच विषय आमच्याकडे काढतात, असे यावेळी बीसीसीआयचे सचिव जय शहा आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले. तुमच्याकडे स्टेडियमसाठी जागा तर आहेच. बीसीसीआयच्या योजनेप्रमाणे स्टेडियम बांधणीसाठी भरीव आर्थिक अनुदान आम्ही देऊ, असा शब्द बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी रोहन गावस देसाई यांना दिला आहे. गोव्यात आंतरराष्ट्रीय स्टेडियमाचा विषय मी यापूर्वी जय शहा तसेच अध्यक्ष रॉजर बिन्नी यांना भेटून व्यक्तिशा मांडला होता. यावेळीही सुद्धा आपण हा विषय सविस्तरपणे त्यांच्यासमोर मांडला. बीसीसीआयने स्टेडियमच्या निर्मितीसाठी सर्वोतोपरी सहकार्य आणि आर्थिक मदत देण्याचे वचन त्यांनी परत एकदा दिल्याचे रोहन गावस देसाई म्हणाले.
वन-म्हावळींगेत स्टेडियम
गोवा क्रिकेट संघटनेकडे धारगळ आणि वन-म्हावळींगे अशा दोन जागा आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम कुठल्या जागेवर बांधायचे हे अजून पक्के होत नाही. धारगळसाठी सुमारे 20 कोटी तर वन-म्हावळींगे येथे सुमारे 40 कोटी गोवा क्रिकेट संघटनेने जमिनीसाठी खर्च केले आहेत. जीसीएच्या आमसभेत धारगळ येथे नियोजित क्रिकेट स्टेडियमच्या बांधणीसाठी मान्यता मिळाली होती. आता वन-म्हावळींगे येथे स्टेडियम बांधण्यात यावा, असा संलग्न क्लबांचा सूर आहे.
ऑक्टोबरमध्ये जीसीए आमसभा
येत्या 8 ऑक्टोबर रोजी गोवा क्रिकेट संघटनेची आमसभा पर्वरीत होणार आहे. या आमसभेत वन-म्हावळींगेतील नियोजित स्टेडियमच्या बाबतीत चर्च होणार आहे. जीसीएच्या व्यवस्थापकीय मंडळाच्या बैठकीत यापूर्वीच वन-म्हावळींगेत स्टेडियम व्हावा, असा सूर व्यक्त झाला आहे. या जागेसाठी जीसीएने 40 कोटी खर्च केले आहेत हा खर्च वाया जाता कामा नाही, असे रोहन गावस देसाई म्हणाले.
शहा, शुक्ला यांची पसंती
बीसीसीआयचे सचिव जय शहा आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी तर वन-म्हावळींगेची जागा ही एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी उत्कृष्ट जागा असल्याचे सांगितले असल्याचे यावेळी रोहन गावस देसाई म्हणाले. वन-म्हावळींगेची जागा बीसीसीआयच्या अनुदानातून घेतली आहे आणि याच जागेवर नियोजित क्रिकेट स्टेडियम व्हावे, असे मत त्यांनी मांडले असल्याचे देसाई म्हणाले. वन-म्हावळींगे येथे स्टेडियम होण्यासाठी तेथील नागरिकांनीही सहकार्य करावे. या स्टेडियममुळे पर्यटनालाही वाव मिळणार असून स्थानिकांना रोजगारांच्या संधीही उपलब्ध होणार आहे. धारगळ आणि वन-म्हावळींगे या दोन्ही जागांचा पर्याय आहे. मात्र सर्वांचे मत वन-म्हावळींगे येथेच स्टेडियम व्हावा असे आहे. याशिवाय शासनाचाही या स्थानावर वरदहस्त असल्याचे यावेळी रोहन गावस देसाई म्हणाले.