सावंतवाडी / प्रतिनिधी
आज स्त्री सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. पण स्त्रियांना अनेक अडचणी उद्भवतात. तसेच त्यांच्यावर अनेक प्रसंग येत असतात. या सर्व समस्या अडचणी सोडवण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. आज शासनाने स्त्रीशक्ती साठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबिर माध्यमातून एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या हक्काच्या व्यासपीठावर स्त्रियांनी आपल्या अडचणी कशा सोडवाव्यात या दृष्टीने पाहिले पाहिजे. आणि याचा लाभ घेतला पाहिजे. असे मत तहसीलदार अरुण उंडे यांनी व्यक्त केले. या स्त्रीशक्ती समाधान शिबिरामध्ये 126 महिलांच्या समस्या दूर करण्यात यश आले. सावंतवाडी वैश्य भवन येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प यांच्यामार्फत स्त्रीशक्ती समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन,दीपप्रज्वलन करून श्री उंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून महिला एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाचे अधिकारी संतोष भोसले, जिल्हा महिला बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ, जिल्हा समन्वयक व्यवस्थापक श्री काळे, श्री काटकर गटविकास अधिकारी वासुदेव नाईक ,बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती भोई, संध्या मोरे आदी उपस्थित होते. या स्त्री शक्ती समाधान शिबिरामध्ये सावंतवाडी तालुक्यातील अनेक स्त्रियांच्या समस्या व तक्रारींचे निवारण करण्यात आले. या शिबिरात 180 तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी 126 तक्रारींचे निरासन व निराकरण करण्यात आल्या. यासाठी एकूण 16 स्टॉल लावण्यात आले होते. या 16 स्टॉलमध्ये दिवसभरात महिलांनी आपल्या अडचणी व शासनाच्या विविध योजनांची माहिती आदींबाबत अर्ज सादर केले होते. त्यांचे निरसन व योग्य पद्धतीत स्त्रियांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. शिलाई मशीन , सायकल, घरघंटी आदींचे लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.