क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे चंदरगी स्पोर्ट्स स्कूल येथे झालेल्या जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत जी.जी. चिटणीस स्कूलच्या मुलींच्या संघाने प्राथमिक व माध्यमिक गटात विजेतपद पटकाविले. हे दोन्ही संघ बागलकोट येथे होणाऱया विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. त्याचप्रमाणे मुलांच्या हॅन्डबॉल संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेत विजेतेपद पटकावून गदग येथे होणाऱया विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे.
मच्छे येथील डिव्हाईन मर्सी स्कूलच्या मैदानावर घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय हॅन्डबॉल स्पर्धेत मुलांच्या संघाने डिव्हाईन मर्सी संघाचा 7-3 अशा गोलफरकाने पराभव करुन विजेतेपद पटकाविले. हा संघ गदग येथील के. एच. पाटील मैदानावर होणाऱया विभागीय स्पर्धेसाठी 28 तारखेला रवाना होणार आहे. मुलींचा हॉकी संघ बागलकोट येथे होणाऱया स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. या सर्व क्रीडापटूंना शाळेचे क्रीडा शिक्षक जयसिंग धनाजी यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापिका डॉ. नवीना शेट्टीगार, शाळेचे अध्यक्ष ऍड. चंद्रहास अणवेकर यांचे प्रोत्साहन लाभत आहे.