एकूण 28559 मतदार : महिला मतदारांची संख्या अधिक
प्रतिनिधी /काणकोण
काणकोण तालुक्यातील 7 पंचायतीची निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी काणकोणचे निर्वाचन अधिकारी मनोज कोरगावकर यांनी सर्व तयारी ठेवली आहे. या निवडणुकीचे उपनिर्वाचन अधिकारी म्हणून अव्वल कारकून गायत्री देसाई जबाबदारी सांभाळणार आहेत.
या तालुक्यातील सात पंचायतीची मतदार संख्या 28659 इतकी असून त्यात महिला मतदार 14560 तर पुरूष मतदारांची संख्या 14099 येवढी आहे. महिला मतदारांची संख्या अधिक आहे. त्यात खोला 3357, आगोंदा 4509, श्रीस्थळ 4114, गावडोंगरी 4109 खोतीगाव 2146, पैंगीण 5847 आणि लोलये पोळे पंचायतीची मतदार संख्या 4573 इतकी आहे.
सात पंचायतीचे एकूण वार्ड 59 इतके असल्याची माहिती काणकोणचे निर्वाचन अधिकारी मनोज कोरगावकर यांनी दिली. या निवडणुकीसाठी एकूण 300 कर्मचाऱयांची नेमणूक करण्यात आली असून येत्या 21 आणि 22 रोजी शेळेर येथील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात या कर्मचाऱयांना निवडणूक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. काल सोमवार पासून अर्ज स्वीकारण्याच्या कामाला प्रारंभ झाला असून 25 पर्यंत सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातात.
26 रोजी छाननी तर 27 रोजी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत देण्यात येणार आहे. ही निवडणूक सुरळीत आणि शांतता पूर्ण रित्या पार पाडण्यासाठी 2 फिरती पथके आणि 7 सेक्टर अधिकाऱयांचे पथक काम करणार आहे. अशी माहिती काणकोणचे निर्वाचन अधिकारी श्री. मनोज कोरगावकर यानी दिली.