लाखो रुपयांचे नुकसान : साहाय्य करण्याची मागणी
वार्ताहर /कुद्रेमनी
दुभती व किंमती गायी, म्हशी अचानक दगावण्याच्या घटनांमुळे कुद्रेमनी गावातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी जयवंत अर्जुन पाटील यांची लाख रुपये किंमतीची गाभण गाय रविवारी अचानक मृत्युमुखी पडली. शनिवारी शेतकरी सागर धाकलू पाटील यांची दुभती म्हैस अचानकपणे दगावली, आठ-दहा दिवसापूर्वी काशिनाथ भुजंग देवण यांची दुभती म्हैस दगावल्यामुळे या शेतकऱ्यांना प्रत्येकी 60 ते 70 हजार रुपयांचे नुकसान सोसावे लागले. घरातील जनावरे गेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. मागील आठवड्यात शेतकरी रावजी मारुती धामणेकर यांची किंमती गाय गोठ्यात दगावली. त्याचबरोबर परशराम रामचंद्र धामणेकर व व्यंकू गुंडू पाटील यांच्या दुभत्या गायी दगाव्ल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
उपाययोजना राबविणे गरजेचे
दुभती जनावरे दगावण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. जनावरांच्या बाबतीत पुढील अनर्थ टाळण्यासाठी संबंधित पशुवैद्यकीय खात्याने उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक साहाय्य करावे अशी मागणी ग्रामस्थांतून करण्यात येत आहे.