2024 च्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रासह देशभरात अनेक घडामोडी घडत आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रसच्या पुढाकाराने इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. या आघाडीमध्ये अनेक पक्ष सामिल होत असतानाच वंचित बहूजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनीही आता इंडिया आघाडीमध्ये सहभाही होण्याची कार्यकर्त्यांची इच्छा असून तसे झाले नाही तर याचा फटका काँग्रेसला बसेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
देशात २०२४ साली लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. केंद्रातील मोदी सरकारचा पराभव करण्यासाठी विरोधक ‘इंडिया’ आघाडीच्या नेतृत्वाखाली एकत्र आले आहेत. त्यातच महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर य़ुती केल्यानंतर वंचित बहुजव आघाडी इंडिया आघाडीमध्ये जाणार का ? असा प्रश्नही विचारला जात आहे. पण, ‘इंडिया’ आघाडीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला आमंत्रण न दिल्यामुळे वंचित बहुजन आघाडीनं यापुर्वीच महाराष्ट्रातील ४८ जागांवर लोकसभा निवडणूक लढणार असे घोषित केले आहे.
त्यानंतर आज एका टिव्ही चॅनेलशी बोलताना वंचित बहूजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी काँग्रेससह इंडिया आघाडीला इशारा दिला आहे. ते म्हणाले, “भाजपाचा पराभव करण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीनं वंचितला निमंत्रण देऊन समाविष्ट करायला पाहिजे. वंचित बहूजन आघाडीने आपल्या पहिल्या निवडणुकीत ४२ लाख मते घेतली आहेत. त्यामुळे वंचितच्या समावेशाने इंडिया आघाडीची ताकद नक्कीच वाढून महाराष्ट्रात भाजपा आणि आरएसएसचा निर्णयक पराभव करू शकतो.” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी इंडिया आघाडीबाबत प्रश्नही उपस्थित केला. ते म्हणाले, “इंडिया आघाडी विचित्र वागत आहे. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा निर्णय होत नसून वंचितांसाठी इंडिया आघाडीचे दरवाजे का बंद आहेत? हा प्रश्न आम्हाला भेडसावत आहे.” असे सुजात आंबेडकरांनी म्हटले आहे.
शेवटी बोलताना त्यांनी, “कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढणार असून भाजपाचा पराभव करणे महत्वाचे आहे. आणि यासाठी आपली युती इंडिया आघाडीशी व्हावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. इंडिया आघाडीशी आघाडी नाही झाली तर कार्यकर्त्यांची इच्छा रागात बदलून त्याचा फटका काँग्रेसला बसेल.” असा इशारा सुजात आंबेडकर यांनी काँग्रेसला दिला आहे.