रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांवर सांडपाणी उडत असल्याने संताप
वार्ताहर /उचगाव
सुळगा( हिं.) येथील बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील बसस्थानका शेजारील सोसायटीनजीक काही राहत्या घरातील ड्रेनेजचे सांडपाणी रस्त्याच्या बाजूने वाहत पुढे तेच पाणी रस्त्यावरून वाहत जाते. रस्त्यावरून ये-जा करणारी वाहने याच पाण्यातून जात असल्याने सदर पाणी नागरिकांच्या अंगावर उडत असल्याने प्रवासी व नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. बेळगाव-वेंगुर्ले मार्गावर सातत्याने रहदारी मोठ्या प्रमाणात असते. सुळगा गावाजवळील बसस्थानका शेजारी काही घरातील ड्रेनेज, सांडपाणी रस्त्याच्या कडेला सोडण्यात आले आहे. सदर पाणी रस्त्याकडून वाहत पुढे पुढे जात ते पाणी रस्त्यावर वाहत आहे. परिणामी या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या अंगावर सदर दूषित, घाणेरडे पाणी उडत असल्याने नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. तसेच या घाणेरड्या पाण्यामुळे नागरिकांची कुचंबणा होत आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने याची दखल घेऊन रस्त्याच्या या बाजूला गटारीची व्यवस्था करून सदर पाणी गटारीने पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळा करून द्यावा. सदर रस्त्याच्या बाजूला अनेक घरे आहेत. घरांच्या परसामध्ये उंच टेकडी असल्याने सदर पाणी जाणे अथवा मुरणे मुश्किल असल्याचे समजते. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने याची तातडीने दखल घेऊन सदर पाणी गटारीद्वारे बाहेर काढणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या सदर पाणी रस्त्यावरून जात असल्याने काही जणांनी माती टाकून पाणी अडवले आहे. यामुळे सदर पाणी साचून याला दुर्गंधी सुटलेली आहे. याचा परिणाम पुन्हा जवळपासच्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तरी सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने पावले उचलावीत आणि या पाण्याचा निचरा करून विल्हेवाट लावावा, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.