Sulochana Latkar Passed Away : पद्मश्री, महाराष्ट्र भूषणनं सन्मानित मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यांनी वयाच्या 94 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. श्वासोच्छवासाचा त्रास आणि इतर आजारांमुळे त्यांना मुंबईतील दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज संध्याकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर सोमवार 5 जून रोजी शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी प्रभादेवी येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या जान्याने मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीवर दु:खाचे सावट पसरले आहे.
मराठा तितुका मेळवावा, मोलकरीण, बाळा जो जो रे, सांगते ऐका, सासुरवास, वहिनीच्या बांगड्या अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका वठवल्या. एवढेच नाही तर अनेक हिंदी चित्रपटात देव आनंद, सुनील दत्त, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन आदी सुपरस्टार अभिनेत्यांच्या आईची ऑनस्क्रीन भूमिका साकारली होती. आई-बहीण, वहिणी या पात्राच्या भूमिका प्रेक्षकांच्या अधिक लक्षात राहिल्या आहेत.