वृत्तसंस्था/ अम्मान (जॉर्डन)
आशियाई पुरुष आणि महिलांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताचा मुष्टीयोद्धा सुमितने 75 किलो वजन गटातून उपांत्य फेरी गाठत आपल्या देशाचे आणखी एक पदक निश्चित केले आहे. पुरुषांच्या 92 किलोवरील वजन गटात भारताच्या नरेंदरने उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. त्याने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत इराणच्या इमानचा 5-0 अशा गुणांनी एकतर्फी पराभव केला. या विजयामुळे भारताला आणखी एक पदक मिळणार आहे.
75 किलो वजन गटातील सोमवारी झालेल्या लढतीमध्ये सुमितने थायलंडच्या बी. केदामदुएनचा 3-2 अशा गुणांनी पराभव करत शेवटच्या चार स्पर्धकामध्ये स्थान मिळविले. सुमितच्या विजयामुळे भारताचे या स्पर्धेतील आणखी एक पदक निश्चित झाले. सदर स्पर्धेमध्ये भारताने आतापर्यंत 12 पदके निश्चित केली आहेत. सुमितने यापूर्वी थायलंड खुल्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. जॉर्डनच्या या स्पर्धेत भारताच्या सचिन आणि लक्ष्य चहर यांचे आव्हान मात्र समाप्त झाले आहे. 71 किलो वजनगटात कजाकस्तानच्या एस. ऍसलेनबेकने सचिनचा 4-1 अशा गुणांनी पराभव केला. 80 किलो वजन गटात उझ्बेकच्या ऍसलोनोव्हने लक्ष्य चहरवर 5-0 अशी एकतर्फी मात करत उपांत्य फेरी गाठली. रविवारी झालेल्या लढतीत भारताच्या अमितकुमार, मोनिका आणि सिमरनजित कौर यांना प्रतिस्पर्ध्यांकडून पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेमध्ये 27 देशांचे सुमारे 267 स्पर्धक सहभागी झाले आहेत. महिलांच्या विभागात लवलिना बोर्गोहेन तसेच परविन यांच्यासह अन्य 7 महिला मुष्टीयोद्धय़ांनी आपल्या वजनगटातून उपांत्य फेरी गाठली आहे.