वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दक्षिण कोरियातील येचेऑन येथे सुरू असलेल्या आशियाई यू-20 अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या सुनील कुमारने डेकॅथ्लॉनचे सुवर्णपदक मिळविले.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी सुनील कुमारला अडचणींना सामोरे जावे लागले. त्याचा पोल व्हॉल्ट पाच मीटर लांब असल्याने दक्षिण कोरिया एअरलाईन्स व एअर इंडिया यांनी तांत्रिक अडचणीमुळे नेण्यास त्याला मनाई केली होती. स्वत:चा पोल व्हॉल्ट नसतानाही त्याने संयोजकांनी दिलेल्या पोल व्हॉल्टवर सुवर्णपदकी यश मिळवून दाखविले. त्याने 7003 गुण नोंदवत वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशनने त्याला पोल पुरविण्याबाबत आयोजकांना विनंती केली होती. सुनील कुमारने या प्रकारात चौथे स्थान मिळविले. सुनीलने 100 मी. हर्डल्स, थाळीफेक, भालाफेक जेतेपद मिळवित अन्य प्रकारातील अपयशाची भरपाई करीत सुवर्ण मिळविले.
महिलांच्या उंच उडीमध्ये भारताच्या पूजाने रौप्य मिळविताना 1.82 मी. उंच उडी घेतली. बुशरा खानने महिलांच्या 3000 मी. शर्यतीत रौप्य मिळवित भारताला आणखी एक पदक मिळवून दिले. तिने या शर्यतीत 9:41.47 से. वेळ नोंदवली. महिलांच्या 4×100 मी. रिलेमध्ये भारताने 45.36 से. अवधी घेत कांस्य मिळविले. या स्पर्धेत रविवारी हीना व भरतप्रीत सिंग यांनी भारताला दोन सुवर्णपदके मिळवून दिली होती. त्यानंतर सोमवारी सिद्धार्थ चौधरीने गोळाफेकमध्ये सुवर्ण मिळविले.