ऑनलाईन टीम / तरुण भारत :
नाशिक महापालिकेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्याकडे 85 लाखांची रोकड आणि 32 तोळे सोने सापडले आहे. यासह धनगर यांची बँक खाती आणि लॉकर्सचा तपास सध्या सुरू आहे. त्यातूनही मोठे घबाड सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
सुनीता धनगर यांना 50 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. त्यानंतर त्यांच्या घराची झडती घेण्यात आली. यावेळी त्यांच्या घरात कोटय़वधींचे घबाड आढळून आले आहे. धनगर यांच्या घरात 85 लाख रुपयांची रोकड आणि 32 तोळे सोने सापडले आहे. धनगर यांच्या नावावर नाशिकमधील उच्चभ्रू वस्तीत दोन फ्लॅट आणि एक प्लॉट आहे. त्यामधील एका फ्लॅटची किंमत दीड कोटी रुपये आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तपास सुरू आहे.
मुख्याध्यापकाकडे मागितली होती लाच
धनगर या सध्या अटकेत आहेत. एका खासगी शैक्षणिक संस्थेतून बडतर्फ करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाने बडतर्फीविरोधात शैक्षणिक न्यायाधीकरणाकडे दाद मागितली. त्यावेळी न्यायाधीकरणाने त्यांच्या बडतर्फीला स्थगिती दिली. दरम्यान, न्यायाधीकरणाच्या निकालानुसार मुख्याध्यापकाने संस्थेकडे सेवेत दाखल करून घेण्यासाठी पाठपुरावा केला असता त्यांनी टाळाटाळ केली. या संस्थेविरोधात कारवाई करण्यासाठी तक्रारदाराने शिक्षणाधिकाऱ्यांकडे अर्ज केला असता त्यावर पत्र देण्यासाठी धनगर यांनी मुख्याधापकाकडे 50 हजारांची मागणी केली. त्यानंतर मुख्याध्यापकाने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली.
तक्रारीची खातरजमा करुन लाचलुचपत विभागाने सापळा रचून धनगर यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. यावेळी धनगर यांच्या कार्यालयातील वरिष्ठ लिपिक नितीन जोशी याने हे पत्र बनवून देण्याच्या मोबदल्यात पाच हजारांची लाच घेतल्याने त्यालाही ताब्यात घेण्यात आले. हा लिपिक महापालिकेच्या शिक्षण मंडळाचा कर्मचारी नसून, तो नाशिकरोडच्या खासगी शैक्षणिक संस्थेतील कर्मचारी असल्याचे समोर आले असून, त्याबाबत तपास सुरू आहे.