सनातन धर्मा’संबंधी अवमानजनक भाषेचे प्रकरण
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सनातन धर्माचा अवमान केल्याप्रकरणी तामिळनाडूचे मंत्री आणि द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठविली आहे. ही नोटीस त्यांच्यासह तामिळनाडूच्या राज्य सरकारलाही पाठविण्यात आली असून न्यायालयाने त्यांची उत्तरे मागविली आहेत. सनातन धर्माचा अवमान करून सर्वसामान्यांच्या भावना दुखाविल्याप्रकरणी स्टॅलीन यांच्या विरोधात एफआयआर सादर करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आली असून या याचिकेसंदर्भात ही नोटीस काढण्यात आली आहे.
सदर याचिका बी. जगन्नाथ यांची असून ती दामा शेषाद्री नायडू या विधीज्ञांनी सादर केली आहे. याचिकेत स्टॅलीन यांच्या विरोधात अनेक आरोप करण्यात आले आहेत. त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना सनातन धर्मासंबंधी नकारात्मक विधाने करण्याची सूचना केली आहे. सनातन धर्म योग्य नसून इतर धर्म चांगले आहेत, असे म्हणत चला असे आवाहन स्टॅलीन यांनी विद्यार्थ्यांना केले असे नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारची विधाने आणि आवाहने जेव्हा मंत्रिपदांवरील व्यक्तींकडून केली जातात, तेव्हा तो गंभीर प्रकार असतो, असे याचिकेत स्पष्ट करण्यात आले आहे.
उच्च न्यायालयात जायला हवे होते
अशाप्रकारची प्रकरणे सोडविण्याचे सर्वोच्च न्यायालय हे स्थान नव्हे. तुम्ही मद्रास उच्च न्यायालयात जायला हवे होते, अशी टिप्पणी न्या. अनिरुद्ध बोस आणि बेला एम. त्रिवेदी यांच्या पीठाने केली. यावर, तामिळनाडूतील पोलीस स्थानकात एफआयआर सादर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तथापि, स्टॅलीन हे मंत्री असल्याने एफआयआर नोंदवून घेण्यास नकार देण्यात आला. ही याचिका एका मंत्र्याविरोधात असल्याने आम्हाला सर्वोच्च न्यायालयात यावे लागले, असा युक्तिवाद नायडू यांनी केला. या युक्तिवादावर विचार करुन न्यायालयाने स्टॅलीन आणि तामिळनाडू सरकारला नोटीस काढण्याचा निर्णय घेतला.
तीन मागण्या
तामिळनाडूचे मंत्री स्टॅलीन यांना सनातन धर्माचा अपमान करणारी विधाने करण्यापासून परावृत्त करावे, त्यांच्याविरोधात एफआयआर सादर करण्याचा आदेश द्यावा आणि विद्यार्थ्यांना या सर्व प्रकारापासून दूर ठेवण्याचा आदेश द्यावा, या तीन मागण्या जगन्नाथ यांच्या याचिकेत करण्यात आल्या आहेत.