वृत्तसंस्था/ माद्रिद
राफेल नदालच्या सध्याच्या हंगामात खेळण्याच्या आशा धुळीस मिळाल्या असून नुकतीच त्याच्या ‘हिप’च्या स्नायूवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यामुळे त्याला अंदाजे पाच महिने मैदानाबाहेर राहावे लागणार आहे, अशी माहिती त्याच्या प्रतिनिधीने शनिवारी दिली. 14 वेळचा फ्रेंच ओपन विजेता आणि 22 ग्रँडस्लॅम किताब जिंकलेल्या नदालला ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यादरम्यान हिप फ्लेक्सरला दुखापत झाल्यानंतर जानेवारीपासून तो बाजूला राहिलेला आहे.
नदालचे प्रतिनिधी बेनिटो पेरेझ-बार्बाडिलो यांनी सांगितले की, राफा काही तासांत त्याचे पुनर्वसन कार्य सुरू करेल आणि पूर्णपणे सावरण्यासाठी त्याला अंदाजे पाच महिने लागतील. या 37 वर्षीय स्पॅनिश खेळाडूने यापूर्वीच सूचित केलेले आहे की, 2024 हे व्यावसायिक खेळाडू म्हणून त्याचे अंतिम वर्ष असण्याची शक्यता आहे. सुऊवातीला नदालला आठ आठवड्यांपर्यंत मैदानाबाहेर राहावे लागण्याची अपेक्षा होती. नदालने या मोसमात इंडियन वेल्स, मियामी, मॉन्टे कार्लो आणि बार्सिलोना येथील स्पर्धांमधून बाहेर पडल्यानंतर माद्रिद आणि रोममधील मातीच्या कोर्टवरील स्पर्धाही तंदुरुस्त होण्याच्या दृष्टीने न खेळण्याचा निर्णय घेतला होता.