पुरस्कार मिळविणाऱ्या पहिल्या भारतीय :
वृत्तसंस्था/ पारामरिबो
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सूरीनामच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रिपब्लिक ऑफ सूरीनामचे अध्यक्ष चंद्रिका प्रसाद संतोषी यांनी मुर्मू यांना ‘द ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ यलो स्टार’ हा पुस्कार प्रदान केला आहे. हा पुरस्कार मिळविणाऱ्या पहिल्या भारतीय ठरण्याचा मान मुर्मू यांना मिळाला आहे.
हा पुरस्कार मिळाल्याने मी स्वत:ला अत्यंत सन्मानित समजत आहे. हा पुरस्कार केवळ माझ्यासाठी नव्हे तर भारतातील 140 कोटी लोकांसाठी देखील अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे उद्गार मुर्मू यांनी काढले आहेत. सूरीनाममध्ये भारतीय वंशाचे लोक पोहोचण्याच्या घटनेला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित एका सांस्कृतिक कार्यक्रमात राष्ट्रपती मुर्मू यांनी भाग घेतला आहे.
दोन्ही देशांदरम्यान सामंजस्य करार
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सूरीनामच्या प्रेसिडेंट पॅलेसमध्ये संतोषी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांदरम्यान शिष्टमंडळ स्तरीय चर्चा देखील झाली आहे. यानंतर दोन्ही देशांदरम्यान 4 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. आरोग्य, कृषी आणि क्षमतावृद्धीच्या क्षेत्रात हे करार झाले आहेत. राष्ट्रपती मुर्मू या रविवारी सूरीनाम येथे पेहोचल्या होत्या. राजधानी पारामरिबोच्या जोहान एडॉल्फ पेंगेल विमानतळावर अध्यक्ष चंद्रिका संतोखी यांनी त्यांचे राजकीय सन्मानासोबत स्वागत केले होते.
व्यापारवृद्धीची मोठी संधी
भारताप्रमाणेच सूरीनाममध्ये अनेक जाती, धर्म अन् भाषा बोलणारे लोक राहतात. भारत आणि सूरीनामची मैत्री ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांवर आधारित आहे. परंतु दोन्ही देशांमधील व्यापाराचे प्रमाण हे क्षमतेपेक्षा खूपच कमी आहे. द्विपक्षीय व्यापार वाढविण्यासाठी सहकार्य वाढविण्याची गरज आहे. संरक्षण, आयुर्वेद आणि औषध क्षेत्रात सहकार्य आणखी वाढविले जाऊ शकते असे मुर्मू यांनी म्हटले आहे.
तांत्रिक सहकार्य
भारत तांत्रिक सहकार्य वाढविण्यासाठी आणि सूरीनामच्या मनुष्यबळाच्या कौशल्य विकासाकरता प्रतिबद्ध आहे. भारत क्विक इम्पॅक्ट प्रोजेक्ट्सला चालना देऊन सूरीनामच्या सामाजिक-आर्थिक विकासात भागीदार होण्यास तयार असल्याचे वक्तव्य राष्ट्रपतींनी केले आहे. सूरीनामकडून भारत-युएनडीपी फंड अंतर्गत तयार करण्यात आलेल्या ‘अर्ली फ्लड वॉर्निंग सिस्टीम’ला मंजुरी देण्यात आल्याने मुर्मू यांनी आनंद व्यक्त केला आहे.
सर्बियाच्या दौऱ्यावर जाणार
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सूरीनामचे अध्यक्ष चंद्रिका प्रसाद संतोषी यांच्या निमंत्रणावर 4-6 जूनपर्यंत त्या देशाच्या दौऱ्यावर होत्या. त्यानंतर राष्ट्रपती मुर्मू या सर्बियाचे अध्यक्ष अलेक्झेंडर वुसिक यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करत बुधवारी सर्बियात पोहोचतील अशी माहिती विदेश मंत्रालयाने दिली आहे.