स्वित्झर्लंडमधील बुद्धिबळ स्पर्धा ः सेतुरामनला दुसरे स्थान
वृत्तसंस्था/ बिएल, स्वित्झर्लंड
भारताचा ग्रँडमास्टर सूर्य शेखर गांगुलीने बिएल बुद्धिबळ महोत्सवातील फिशर रँडम स्पर्धेत जेतेपद पटकावले तर त्याचाच देशवासी एसपी सेतुरामनने दुसरे स्थान मिळविले.
39 वर्षीय सूर्य शेखर गांगुलीने 7 फेऱयांत 6.5 गुणांची कमाई करीत पहिले स्थान मिळविले तर सेतुरामन व फ्रान्सची महिला बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर व्हेरा नेबोल्सिना यांनी प्रत्येकी 5.5 गुण मिळविले. गांगुलीने सातही फेऱयांत अपराजित राहताना सहा विजय मिळविले व अलेक्झांड्रा कोस्टेनियुकविरुद्धचा एक डाव अनिर्णीत राखला. त्याने अराशविर मुसेलयन (स्वित्झर्लंड), जोस अँटोनिओ हेरेरा रेयेस (स्पेन), सेतुरामन व कॉन्स्टन्टिनोस रेगिओस (ग्रीस) यांच्यावर विजय मिळविले. सेतुरामनला गांगुलीकडून पराभव स्वीकारावा लागल्याने त्याला दुसऱया स्थानावर समाधान मानावे लागले.
दरम्यान, किशोरवयीन भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेश ग्रँडमास्टर ट्रायथ्लॉन व आठ ग्रँडमास्टर्सच्या क्लासिकल इव्हेंटमधील रॅपिड विभागात खेळताना दिसणार आहे. रविवारी झालेल्या ऍक्सेन्टस चेस 960 स्पर्धेत त्याने 3.5 गुण घेत सहावे स्थान मिळविले होते. यात सहभागी झालेल्या आठ ग्रँडमास्टर्समध्ये व्हिन्सेंट केमर (जर्मनी), सालेम सालेह (यूएई), अमेरिकेचा अनुभवी गॅटा कामस्की व चीनचा यु यांगी यांचा समावेश आहे.