लंका 91 धावांनी पराभूत, अक्षर पटेल मालिकावीर, सूर्यकुमार सामनावीर
वृत्तसंस्था/ राजकोट
हार्दिक पांडय़ाच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने राजकोटच्या मैदानावर शनिवारी तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेवर आपला शिक्कामोर्तब केला. सूर्यकुमार यादवच्या वादळी नाबाद शतकाच्या जोरावर भारताने लंकेचा 91 धावांनी दणदणीत पराभव केला. अक्षर पटेलला ‘मालिकावीर’ तर सूर्यकुमार यादवला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. भारताने ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली असून आता उभय संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळविली जाणार आहे. सूर्यकुमार यादवचे टी-20 प्रकारातील हे तिसरे शतक आहे. सूर्यकुमारच्या फटकेबाजीमुळे क्रिकेट शौकीन बेहद खूष झाले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकात 5 बाद 228 धावा जमवल्यानंतर लंकेचा डाव 16.4 षटकात 137 धावावर आटोपला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. मधुशंकाच्या पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर सलामीचा ईशान किसन झेलबाद झाला. त्याने केवळ 1 धाव जमविली. शुभमन गिल आणि राहुल त्रिपाठी यांनी 5.1 षटकात 49 धावांची भर घातली. करुणारत्नेने डावातील सहाव्या षटकात त्रिपाठीला झेलबाद केले. त्याने 16 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 35 धावा झळकविल्या.
शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांनी लंकेची गोलंदाजी पूर्ण झोडपून काढली. या जोडीने 8.5 षटकात 111 धावांची शतकी भागीदारी केली. डावातील पंधराव्या षटकात गिल हसरंगाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. गिलने 36 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 46 धावा झळकविल्या. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला हार्दिक पांडय़ा केवळ 4 चेंडूना सामोरे जात तंबूत परतला. रजिताने त्याला झेलबाद केले. मधुशंकाने दीपक हुडाला 4 धावांवर झेलबाद केले. सतराव्या षटकात भारताचा हा पाचवा फलंदाज बाद झाला.
सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल यांनी सहाव्या गडय़ासाठी अभेद्य 39 धावांची भागीदारी केली. टी-20 प्रकारात सूर्यकुमारने आपले तिसरे शतक झळकविले. या सामन्यात त्याने 9 षटकार आणि 7 चौकारांसह 51 चेंडूत नाबाद 112 धावा झोडपल्या. अक्षर पटेलने केवळ 9 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 21 धावा जमविल्या. भारताच्या डावामध्ये 15 षटकार आणि 19 चौकार नोंदविले गेले.
सूर्यकुमारने आपले हे तिसरे शतक 45 चेंडूत पूर्ण केले. सूर्यकुमारच्या फटकेबाजीने पुन्हा एकदा राजकोटच्या शौकिनांना बेहद्द खुश केले. लंकेचे गोलंदाज या सामन्यात आपले वर्चस्व गाजवू शकले नाहीत. लंकेतर्फे मधुशंकाने 2 तर रजिता, करुणारत्ने आणि हसरंगा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. भारताच्या डावात 14 षटकार आणि 19 चौकार नोंदविले गेले.
सूर्यकुमारची झंझावाती खेळी
सूर्यकुमार यादवच्या झंझावाती शतकी खेळीच्या जोरावर भारताने शनिवारी तिसऱया ‘टी20’ सामन्यात 5 बाद 228 धावा काढून श्रीलंकेसमोर कठीण लक्ष्य ठेवले. सूर्यकुमारने नाबाद 112 धावांची खेळी केली. प्रथम फलंदाजी करताना भारताने इशान किशनला (1) लवकर गमावले होते. परंतु शुभमन गिल (46 धावा), राहुल त्रिपाठी (35 धावा) आणि सूर्यकमार यांनी जबरदस्त फटकेबाजी करून श्रीलंकेला वर्चस्व गाजविण्याची कुठेही संधी दिली नाही. त्रिपाठीच्या धावा फक्त 16 चेंडूत आल्या आणि त्यात पाच चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.
पण शनिवारचा दिवस खऱया अर्थाने सूर्यकुमारचा राहिला. पॉवरप्लेमध्ये भारताने इशान किशन आणि राहुल त्रिपाठी यांना गमावल्यानंतर फलंदाजीला आलेल्या या खेळाडूने 51 चेंडूंत नाबाद 112 धावा काढताना सात चौकार आणि नऊ षटकार ठोकले. त्याच्या आक्रमक खेळीमुळे भारताला पहिल्या 10 षटकात 92 धावा काढता आल्या. सूर्याने श्रीलंकेच्या माऱयाला पार निष्प्रभ करून टाकताना आपल्या इच्छेनुसार चौकार, षटकारांचा वर्षाव केला आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीने शतक झळकावले.
26 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केल्यानंतर शतकाचा टप्पा गाठण्यासाठी सूर्यकुमारला केवळ 19 चेंडू लागले. त्याने शेवटच्या षटकात चमिका करुणारत्नेच्या चेंडूवर एक षटकार आणि एक चौकार फटकावून डावाचा शेवट केला. बाकीच्या खेळाडूंमध्ये कर्णधार हार्दिक पांडय़ा आणि दीपक हुडाला फारशी चमक दाखविता आली नाही आणि दोघांचाही डाव प्रत्येकी 4 धावांवर आटोपला. त्यामानाने शेवटच्या टप्प्यात अक्षर पटेलने सूर्यकुमारला चांगली साथ देताना नाबाद 21 धावा फटकावल्या.
सूर्याचे तिसरे शतक
सूर्यकुमार यादवने ‘टी20’मध्ये झळकावलेले हे तिसरे शतक असून केवळ 45 चेंडूत त्याने हा टप्पा गाठला. अनुभवी रोहित शर्मानंतर ‘टी20’मध्ये तीन किंवा अधिक शतके ठोकणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. याभरात 2016 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 46 चेंडूत शतक झळकावलेल्या राहुलला मागे टाकून त्याने भारतातर्फे दुसऱया सर्वांत जलद शतकाची नोंद केली. ‘टी 20’मधील सर्वांत जलद शतक रोहित शर्माच्या नावावर आहे.
भारताने दिलेल्या 229 धावांच्या आव्हानाला सामोरे जाताना लंकन संघाची फलंदाजी सुरुवातीला बऱयापैकी झाली. निशांका आणि कुशल मेंडिस यांनी सलामीच्या गडय़ासाठी 29 चेंडूत 44 धावांची भागीदारी केली पण अक्षर पटेलने कुशल मेंडिसला उमरान मलिककरवी झेलबाद केल्यानंतर लंकेच्या डावाला गळती सुरू झाली. मेंडिसने 2 षटकार आणि 2 चौकारासह 23 धावा जमविल्या. हार्दिक पांडय़ा, अर्शदीप सिंग, अक्षर पटेल, उमरान मलिक आणि यजुवेंद्र चहल यांच्या अचूक गोलंदाजीसमोर लंकेचा डाव 16.4 षटकात 137 धावात आटोपला. त्यामध्ये कुशल मेंडिसने 23, धनंजय डिसिल्वाने 22, शनाका 23 तसेच असालेंकाने 19 व निशांकाने 15 धावा जमवल्या. लंकेच्या डावात 6 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. लंकेने आपले पहिले अर्धशतक 6 षटकात तर शतक 11.5 षटकात झळकविले. पॉवर प्लेमध्ये त्यांनी 51 धावा जमविताना 2 गडी गमाविले. लंकेच्या डावात दोनवेळा रिव्हय़ू घेण्यात आला होता. डावातील पहिल्याच चेंडूवर पी. निशांकाला पंचांनी बाद ठरविले होते पण या रिव्हय़ूने निशांकाला पुन्हा जीवदान मिळाले होते. हे षटक हार्दिकचे होते. भारतातर्फे अर्शदीप सिंगने 3, हार्दिक पांडय़ा, उमरान मलिक आणि यजुवेंद्र चहल यांनी प्रत्येकी दोन तर अक्षर पटेलने एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
भारत- 20 षटकात 5 बाद 228 (ईशान किसन 1, शुभमन गिल 46, राहुल त्रिपाठी 35, सूर्यकुमार यादव नाबाद 112, हार्दिक पांडय़ा 4, दीपक हुडा 4, अक्षर पटेल नाबाद 21, अवांतर 5, मधुशंका 2-55, रजिता 1-35, करुणारत्ने 1-52, हसरंगा 1-36).
श्रीलंका- 16.4 षटकात सर्वबाद 137 (निशांका 15, कुशल मेंडिस 23, आविष्का फर्नांडो 1, धनंजय डिसिल्वा 22, असालेंका 19, दासुन शनाका 23, हसरंगा 9, करुणारत्ने 0, महेश तीक्ष्णा 2, रजिता नाबाद 9, मधुशंका 1, अवांतर 13, पांडय़ा 2-30, अर्शदीप सिंग 3-20, मावी 1-0, अक्षर पटेल 1-10, उमरान मलिक 2-31, चहल 2-30).