शुक्रवारपर्यंत सरासरी 96.50 इंच पावसाची नोंद
पणजी : तब्बल 16 दिवसांनंतर गोव्यातील जनतेला काल शुक्रवारी सूर्यदर्शन घडले. पावसाने शुक्रवारी संपूर्ण दिवस विश्रांती घेतली. शुकवारपर्यंत 96.50 इंच एवढी सरासरी यंदा पावसाने गाठलेली आहे. सोमवारपर्यंत 3.50 इंच पावसाची शक्यता कमीच आहे. त्यामुळे इंचाचे शतक गाठणे जुलै अखेरपर्यंत पावसाला शक्य होईल का? याबाबत साशंकता आहे. शुक्रवारी सोळा दिवसांनंतर पावसाने विश्रांती घेतली. सूर्यदर्शनासाठी ढगांनी स्वत: बाजूला रहाणे पसंत केल्याने जनतेला बऱ्याच प्रमाणात दिलासा मिळाला. गेले 16 दिवस पावसाने कहरच केला होता. पावसाने अल्पावधीत इंचाच्या शतकापर्यंत केलेला प्रवासही ऐतिहासिक आहे. शुक्रवारी पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी, बगायतदार यांनाही कामे करणे शक्य झाले. आगामी तीन दिवस मध्यम तथा हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 1 इंच पावासाची नोंद झाली. यंदा सरासरीच्या तुलनेत 31 टक्के अतिरिक्त पाऊस पडला. गेल्या 24 तासांमध्ये नेंदविलेला पाऊस पुढील प्रमाणे (इंचात) : पेडणे – 0.50, फोंडा-0.50, पणजी-0.50, जुने गोवे-0.50, सांखळी-0.75, काणकोण-0.50, दाबोळी-0.50, मडगाव-1, केपे-1.50, सांगे-2. वाळपई व केपे येथे प्रत्येकी आतापर्यंत 106.50 इंच पावासाची नोंद झाली. गोव्यातील सर्वाधिक पावासाची नोंद 112.50 इंच सांगे येथे नोंदविली आहे. सकाळपासून सर्व ठिकाणी सूर्यदर्शन घडल्यानंतर राज्यातील सर्वच ठिकाणची वाहतूक शुक्रवारी सुरळीत राहिली.