वृत्तसंस्था/ नॉटिंगहॅम
सूर्यकुमार यादवने तडाखेबंद शतक झळकवले तरी अन्य फलंदाजांकडून त्याला पुरेशी साथ न मिळाल्याने येथे झालेल्या तिसऱया व शेवटच्या टी-20 सामन्यात यजमान इंग्लंडने 17 धावांनी विजय मिळविला. मात्र ही मालिका भारताने 2-1 अशा फरकाने जिंकली. एकाकी लढत देणाऱया सूर्यकुमार यादवने 55 चेंडूत 14 चौकार, 6 षटकारांची आतषबाजी करीत 117 धावा झोडपल्या. रीस टॉपलीला सामनावीर तर भुवनेश्वर कुमारला मालिकावीर पुरस्कार मिळाला.
डेव्हिड मलान व लियाम लिव्हिंगस्टोन यांनी केलेल्या जोरदार फटकेबाजीमुळे यजमान इंग्लंडने निर्धारित 20 षटकांत 7 बाद 215 धावांचा डोंगर रचला. त्यानंतर भारताला 20 षटकांत 9 बाद 198 धावांवर रोखत इंग्लंडने विजय साकार केला. सूर्यकुमारशिवाय श्रेयस अय्यरने 23 चेंडूत 28, रोहित शर्मा व कोहली यांनी प्रत्येकी 11 धावा जमविल्या. इतरांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. टॉपलीने भेदक मारा करीत 3 बळी मिळविले. आता मंगळवारी उभय संघांत पहिला वनडे सामना ओव्हलवर होणार आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर कर्णधार जोस बटलर (9 चेंडूत 18) व जेसॉन रॉय (26 चेंडूत 27) यांनी सहा षटकांच्या पॉवरप्लेमध्ये 1 बाद 52 धावांची मजल मारून दिली. फिल सॉल्टही 8 धावा काढून बाद झाल्यानंतर मलान व लिव्हिंगस्टोन यांनी नंतर जोरदार फटकेबाजी करीत चौथ्या गडय़ासाठी 84 धावांची भागीदारी करीत संघाला मोठय़ा धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करून दिली. लिव्हिंगस्टोनने 29 चेंडूत 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 42 धावा झोडपल्या. भारताने ही मालिका याआधीच जिंकली असल्याने या सामन्यात आघाडीचे गोलंदाज जसप्रित बुमराह, भुवनेश्वर कुमार व यजुवेंद्र चहल तसेच अष्टपैलू हार्दिक पंडय़ा यांना विश्रांती दिली होती.
भारताच्या नवोदित गोलंदाजांवर आक्रमक हल्ला करण्याचे धोरण ठेवत इंग्लंडने पहिल्या दोन सामन्यातील फलंदाजीतील अपयश भरून काढले. फक्त रवी बिश्नोईने किफायतशीर मारा करीत 30 धावांत 2 बळी मिळविले. याशिवाय हर्षल पटेलनेही 35 धावांत 2 बळी टिपले. अन्य गोलंदाजांकडून मात्र साधारण कामगिरी झाली. बटलरने आपल्या अल्पशा खेळीत अननुभवी उमरान मलिकवर हल्ला करून पहिल्याच षटकात 17 धावा वसूल करताना 2 चौकार, 1 षटकार मारला. अवेश खानने संथ चेंडूवर बटलरला चकवा देत त्रिफळाचीत केले. मलिकच्या गोलंदाजीवर रॉय यष्टिरक्षकाकरवी झेलबाद झाल्यानंतर मलानने धावांचा वेग वाढवत सफाईदार फटकेबाजी केली. त्याने स्पिनर्सविरुद्ध स्वीपचा तर जलद गोलंदाजांविरुद्ध पुलचा सढळ वापर करीत चौकार, षटकार मिळविले. त्याने एकूण 5 षटकार लगावले, त्यापैकी जडेजाला स्वीपचा आणि लो फुल टॉसवर अवेशला मारलेले षटकार अप्रतिम होते. लिव्हिंगस्टोनने नेहमीप्रमाणे षटकारावर भर देत हॅरी ब्रुक (9 चेंडूत 19) व ख्रिस जॉर्डन (3 चेंडूत 11) यांच्यासमवेत संघाला दोनशेच्या पुढे मजल मारून दिली. लिव्हिंगस्टोनला विराट कोहलीकडून डीपमध्ये एक जीवदानही मिळाले. इंग्लंडने शेवटच्या दहा षटकांत तब्बल 129 धावांची लयलूट केली. मलिक सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने चार षटकांत एक बळी मिळविताना 56 धावा दिल्या. याशिवाय हर्षल पटेलने 2 बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड 20 षटकांत 7 बाद 215 ः जेसॉन रॉय 27 (26 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), बटलर 18 (9 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), डेव्हिड मलान 77 (39 चेंडूत 6 चौकार, 5 षटकार), फिल सॉल्ट 8 (6 चेंडूत 1 चौकार), लिव्हिंगस्टोन नाबाद 42 (29 चेंडूत 4 षटकार), मोईन अली 0, हॅरी बुक 19 (9 चेंडूत 3 चौकार), जॉर्डन 11 (3 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), अवांतर 13. गोलंदाजी ः अवेश खान 1-43, उमरान मलिक 1-56, बिश्नोई 2-30, जडेजा 0-45, हर्षल पटेल 2-35.
भारत 20 षटकांत 9 बाद 198 ः रोहित शर्मा 12 चेंडूत 11, कोहली 6 चेंडूत 11, श्रेयस अय्यर 23 चेंडूत 28 (2 षटकार), सूर्यकुमार यादव 117 (55 चेंडूत 14 चौकार, 6 षटकार), कार्तिक 6, जडेजा 7, हर्षल पटेल 5, बिश्नोई 2, अवांतर 9. गोलंदाजी ः डेव्हिड विली 2-40, रीस टॉपली 3-22, जॉर्डन 2-37, मोईन अली 1-31, रिचर्ड ग्लीसन 1-31.