Gautami Patil Sur name : तरुणाईला वेढ लावणारी गौतमी तिच्या नृत्याने चर्चेत असते.मात्र आता पुन्हा आडनावरून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पाटील या आडनावरुन उलट-सुलट चर्चा होत आहे. गौतमीने पाटील हे आडनाव वापरु नये अन्यथा तिचे कार्यक्रम राज्यात चालू देणार नाही,असा इशारा राजेंद्र पाटील यांनी दिला आहे.दरम्यान शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेली फेसबुक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. एका पुस्तकाचा हवाला देत काही बुध्द अनुयायींनी आडनाव कुलकर्णी, पाटील आणि कर्णिक केल्याचं त्यांनी सांगितलं आहे. नृत्यांगना असणाऱ्या माधुरी दीक्षित, माधुरी पवार यांना आडनाव बदलायला सांगितले नाही मग गौतमीलाच का? असा सवालही त्यांनी केलायं.
सुषमा अंधारे पोस्ट करत काय म्हणाल्या
नावात काही आहे की नाही यावर खूप चर्चा झाली.पण आडनावात काही आहे का नाही.तर निश्चितपणे आडनावात खूप काही दडले.आडनावात वर्णश्रेष्ठतावाद आहे.चातुर्वर्ण्य व्यवस्थेनुसार ब्राह्मणवर्णातील आडनाव ही विद्यामय असावीत.क्षत्रिय वर्णीयांची आडनावे वीरमय,वैशांची आडनावे ही व्यापारमय असावी,तर शूद्रांची आडनावे ही निंदनीय असावीत असे गृहीतक आहे.ढोरगवार पशु शूद्र नारी सब ताडन के अधिकारी ही ओळ ही एका अर्थाने शूद्र स्त्रिया किंवा जनावरे यांना एकाच तराजूत तोलावे अशा आशयाची येते.शूद्र वर्णांमध्ये बहुतांश आडनावे हि पशूंच्या नावावर दिसतात जसे डुकरे,बैले,पारवे हत्ती,आंबिरे,मांजरे,निळे ,हिरवे इ .
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धा नंतर वर्णव्यवस्था तितकीशी जाणवत नाही.मात्र जात व्यवस्थेची दाहकता आजही टिकून आहे ग्रामीण भागात ती विशेषत्वाने जाणवते.त्यामुळे ग्रामीण भागातून स्वतःला आजमावू पाहणारी आणि अत्यंत उपेक्षित व पीडित वर्गातून येणारी नवी पिढी बऱ्याचदा आडनावे बदलून नागरवस्तीमध्ये स्वतःला सिद्ध करू पाहतात.एका अर्थाने अशा पद्धतीने आडनावे बदलून लोकांना राहावे लागते; हे भारतीय समाज व्यवस्थेतील जातीव्यवस्था घट्ट करू पाहणाऱ्यांचा विजयच म्हणावा लागेल.
आंबेडकरी चळवळतील अत्यंत ज्येष्ठ साहित्यीक आणि महत्त्वाचे नाव म्हणजे बाबुराव बागुल यांचं “जेव्हा मी जात चोरली होती” हे पुस्तक या अर्थाने प्रचंड महत्त्वाचे ठरते.”जयसिंगपूर मधील अनेक बौद्धांनी आपली आडनावे भाटिया, कुलकर्णी किंवा कर्णिक केलेली आढळतात.तर नागपूरकडे अनेक बौद्धांनी आडनावे पाटील अशी लावलेली आहेत.जळगाव, धुळे, चाळीसगाव या भागामध्ये भटक्या विमुक्तातील अनेक जात समुदायातील आडनावे ही मूळची वेगळी मात्र नंतर पाटील लावलेली दिसतात.थोडक्यात काय तर हा सगळा आटापिटा जात ओळखली गेली तर कदाचित आपली संधी डावल्ली जाईल की काय या भीतीपोटीचा.
यात अजून एक वेगळ्या प्रकारची माणसं पण आहेत की जी मूळ प्रस्थापित आहेत किंवा जी सवर्ण आहेत मात्र त्यांची आडनावे त्यांना काहीशी अडचणीची वाटतात….आणि म्हणून आडनावांच्या सोबत ते पाटील असेही बिरूद लावतात.उदाहरणार्थ माझ्या वर्गात माझ्यासोबत शिकणारा एक मुलगा त्याचे संपूर्ण इंजिनिअरिंग पर्यंतचे शिक्षण होईपर्यंतचे आडनाव गाढवे होते.मात्र मागील दोन वर्षात त्याने त्याचे आडनाव गाढवे पाटील असे केले.किंवा एखाद्याचे आडनाव काळोखे असेल तर काळोखे पाटील करणे किंवा कोळसे असेल तर कोळसे पाटील करणे,आवारे असेल तर आवारे पाटील करणे…
गौतमी पाटील प्रकरणात मात्र अजूनच वेगळी गंमत आहे. तिला असलेले पाटील आडनावच काढून टाकायला सांगितले जात आहे.इथे ही बाब उल्लेखनीय आहे की,नृत्यांगना असणाऱ्या माधुरी दीक्षित यांना कधीही दीक्षित आडनाव काढण्याचे सल्ले कुणी दिले नाही किंवा ममता कुलकर्णी यांनाही कुलकर्णी आडनाव काढून टाकण्याचे सल्ले दिले नाही. अगदी माधुरी पवारला सुद्धा पवार आडनाव काढण्याचे सल्ले दिले गेले नाही.मग हा सल्ला किंवा ही धमकी गौतमी पाटीललाच का बरे..?
एखाद्या मुलीला,माय माऊलीला तिच्या उदरनिर्वाहासाठी एखादे असे काम करावे लागते की जे काम व्यवस्थेला घृणास्पद वाटते तर याचा अर्थ असा आहे की एक तर तुमची नजर दूषित आहे , ती सुद्धा तुमच्यासारखीच दोन हाताची दोन पायाची माणूस आहे.पण तिचं माणूस पण स्वीकारणं तुम्हाला जड जातय किंवा तिला तिथपर्यंत पोहोचायला भाग पाडणारी त्याला जबाबदार तुमची अपयशी अर्थव्यवस्था आहे.आणि हे अपयश झाकण्यासाठी तुम्ही तुमच्या मनगटबळाच्या जोरावर अशी दडपशाही करता, असे सुषमा अंधारे यांनी म्हटलयं.
Previous Article‘आप’च्या स्वराज्य यात्रेला उद्यापासून पंढरपुरातून सुरुवात
Next Article सदाशिव पेठेत 5 लाखांच्या चरससह एकाला अटक
Archana Banage
Archana Bange, a seasoned journalist with four years of experience, has made a notable impact in the field of journalism. She pursued her journalism studies at Shivaji University, Kolhapur, and began her career at Daily Sakal. Currently, Archana is a valued member of the Dainik Tarun Bharat group, where she focuses on reporting local news from the districts of Kolhapur, Sangli, Satara, Sindhudurg, and Ratnagiri in Western Maharashtra. Her expertise extends to various topics, including politics, breaking news, food, lifestyle, tourism, blogs, health, web stories, and captivating human interest stories.
Related Posts
Add A Comment