पोलिसांचे संशयित आरोपीच्या निवासस्थानासह चार ठिकाणी छापे
प्रतिनिधी / बेंगळूर
मंगळूरमध्ये ऑटोरिक्षामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. संशयित आरोपी शरीक याचे एका आंतरराष्ट्रीय पातळीवरील दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे समोर आले आहे. या दहशतवादी संघटनेमुळे तो प्रभावित झाला होता, अशी माहिती कायदा-सुव्यवस्था विभागाचे एडीजीपी अलोककुमार यांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी शिमोगा पोलिसांनी शरीकच्या मूळ गावातील निवासस्थानासह 4 ठिकाणी छापे टाकून झडती घेतली आहे.
ऑटोरिक्षामधील बॉम्बस्फोटप्रकरणी शिमोग्याच्या तीर्थहळ्ळी येथील संशयित आरोपी शरीक याच्या निवासस्थानासह त्याच्या नातेवाईकांच्या घरांवर चार ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईवेळी पोलिसांनी 15 जणांची चौकशी केली आहे. शरीकच्या निवासस्थानावर चार अधिकाऱ्यांच्या पथकाने धाड टाकून तपासणी केली. दरम्यान, स्फोटप्रकरणी म्हैसूर पोलिसांनी बेंगळूरमधून आणखी एकाला अटक केली आहे.
आतापर्यंत चौघांना अटक
मंगळूरमध्ये ऑटोरिक्षात झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी आणखी एका संशयिताला बेंगळूरमधून अटक करण्यात आली आहे. के. जी. हळ्ळी येथे महम्मद रुहुल्ला याला पोलिसांनी अटक केली आहे. महम्मदचे आरोपी शरीकशी निकटचे संबंध असल्याची माहिती प्राथमिक तपासातून पुढे आली आहे. के. जे. हळ्ळी येथील महम्मदच्या अटकेसाठी म्हैसूर पोलीस रविवारीच बेंगळूरला आले होते. महम्मद रुहुल्ला बेंगळूरमध्ये का आला?, याविषयी पोलिसांकडून तपास सुरू आहे. त्याची पार्श्वभूमी, घरचा पत्ता यासह विविध माहिती म्हैसूर पोलिसांकडून जमा केली जात आहे. स्फोटप्रकरणी आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली आहे. म्हैसूरमधून दोघांना, मंगळूर आणि उटी येथून प्रत्येकी एकाला अटक करण्यात आली आहे.
दोन प्रकरणांमध्ये होता जामिनावर मुक्त
शिमोग्यात 20 ऑगस्टला तणाव निर्माण झाल्यानंतर शहरात जमावबंदी जारी करण्यात आली होती. या दिवशी प्रेमसिंग या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या घटनेप्रकरणी जबीउल्ला याला अटक करण्यात आली होती. शरीकचाही त्यात सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले होते. त्याच्याविरोधात यापूर्वी 2020 मध्ये भिंतीवरील आक्षेपार्ह लेखनप्रकरणी मंगळूरमधील पूर्व आणि उत्तर पोलीस स्थानकात तसेच सप्टेंबर 2022 मध्ये शिमोगा ग्रामीण पोलिसांनी गुन्हे दाखल होते. या दोन प्रकरणांमध्ये त्याची जामिनावर मुक्तता झाली होती. शिमोग्यातील चाकूहल्ला प्रकरणानंतर शरीकने म्हैसुरात आसरा घेतला. त्याने तेथे मोहनकुमार नामक व्यक्तीचे घर भाडोत्री घेतले होते. म्हैसूरमधील त्याच्या घरात स्फोटके व इतर साहित्य आढळून आले आहे. कोईमत्तूरमध्येही त्याने बनावट ओळखपत्राचा वापर करून वास्तव्य केले होते, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोककुमार यांनी मंगळूरमध्ये पत्रकार परिषदेत दिली.
कुटुंबीयांनी शरीकची ओळख पटविली
8 सप्टेंबर रोजी शरीकने मंगळूरला भेट देऊन शहरात फेरफटका मारून ठिकाणांची माहिती घेतली होती. तर शनिवारी ऑटोरिक्षातून कुकर घेऊन जात असताना त्यातील बॉम्बचा अचानक स्फोट झाला. या बॉम्बस्फोटात शरीक 40 टक्के भाजून जखमी झाला आहे. सोमवारी त्याची ओळख पटविण्यासाठी त्याची काकू, बहीण शिमोग्यातून मंगळूरच्या इस्पितळात आले होते. शरीककडून जप्त करण्यात आलेला मोबाईल व त्याची ओळख कुटुंबीयांनी पटविली आहे.
आरोपी बी. कॉम. पदवीधर
संशयित आरोपी शरीकला बॉम्ब तयार करण्याचे तितके ज्ञान नव्हते. कुकरमध्ये योग्य पद्धतीने बॉम्ब जोडणी न केल्याने ऑटोरिक्षातच त्याचा स्फोट झाला. कमी तीव्रतेचा स्फोट झाल्यामुळे ऑटोरिक्षा चालक पुरुषोत्तम पुजारी आणि शरीक जखमी झाले आहेत. पुरुषोत्तमवरही उपचार केले जात आहे. शरीक बी. कॉम. पदवीधर असल्याची माहिती एडीजीपी अलोककुमार यांनी दिली.