घरात काम करणाऱया मोलकरणीचा 8 वर्षे छळ केल्याचा आरोप
@ रांची / वृत्तसंस्था
झारखंडमधील निलंबित भाजप नेत्या सीमा पात्रा यांना घरच्या मोलकरणीचा छळ केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. सुनीता असे या मोलकरणीचे नाव असून ती आदिवासी समाजातील आहे, अशी माहिती देण्यात आली. पात्रा या एका निवृत्त आयएसएस अधिकाऱयाच्या पत्नी आहेत. मात्र, पात्रा यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप नाकारले असून निर्दोष असल्याचे प्रतिपादन केले आहे.
पात्रा यांच्याविरोधात प्रथमदर्शनी अहवाल सादर करण्यात आला असून त्यांची पोलीस कोठडी मागण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. त्यांच्यावर भारतीय दंड विधानाच्या अंतर्गत विविध आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यांची मोलकरीण सुनीता यांनी तिचा छळ केल्याचा आरोप सोशल मीडियावर केला असून तिचा व्हिडिओ प्रसारित होत आहे. आपल्यावरील आरोप राजकीयदृष्टय़ा प्रेरित असून हा सूड उगविण्याचा प्रकार असल्याचे पात्रा यांचे म्हणणे आहे.
काय आहेत आरोप?
सीमा पात्रा यांनी सुनीता (वय 29) हिला घरात कोंडून ठेवले होते. तिला मारहाण केली जात होती. आठ वर्षे तिच्यावर मूत्रप्राशन करण्याची सक्ती करण्यात आली होती. तसेच घरातील फरशी जिभेने चाटण्यास तिला सांगण्यात येत होते. अनेक प्रकारे तिचा छळ करण्यात येत होता, असे आरोप पात्रा यांच्यावर आहेत.
अंगावर अनेक जखमा
सुनीता हिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तिच्या अंगावर माराच्या अनेक खुणा दिसून येतात, अशी माहिती देण्यात आली. अनेक दिवसांपासून तिचा छळ केला जात होता, असे प्रथमदर्शनी समजून येते. गरम पळीने चटके देणे, लोखंडी सळीने मारहाण करणे आदी प्रकारे तिचा छळ करण्यात येत होता, असे प्रारंभिक वैद्यकीय तपासणीच्या आधारे स्पष्ट होत असल्याचा दावा करण्यात आला. अनेकदा तिला अन्नपाणीही नाकारण्यात येत होते, असा आरोप आहे.
पुत्रच ठरला तारणहार
सीमा पात्रा यांचा पुत्र आयुषमान यानेच मोलकरणीवर आपली आई करीत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. त्याने त्याच्या मित्राला यासंबंधीची माहिती दिली. तसेच आईच्या तावडीतून मोलकरणीची सुटका करण्यासाठी साहाय्य करण्याची विनंती केली. मित्राने नंतर पोलिसांनी माहिती दिली. या माहितीच्या आधारावर पात्रा यांना अटक करण्यात आली. अशाप्रकारे आरोपीच्या पुत्रानेच या प्रकरणात तारणहाराची भूमिका साकारली असल्याचे दिसून येते.