बेळगाव : रेल्वेरूळावर आढळून आलेल्या ट्रान्समीटरमुळे एकच धावपळ उडाली. शनिवारी सायंकाळी लोंढ्याजवळ हा ट्रान्समीटर रेल्वे पोलिसांना आढळून आला असून सुरुवातीला सारेच धास्तावले होते. मात्र, चौकशीअंती बोटीवर वापरण्यात येणारी आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यात येणारी सिग्नल यंत्रणा असल्याचे समजताच साऱ्यांचे जीव भांड्यात पडले. बेळगाव रेल्वे पोलिसांना गस्तीच्यावेळी रेल्वेरूळावर हा ट्रान्समीटर आढळला. यामध्ये स्फोटके आहेत का? या संशयाने पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली. गेल्या पंधरवड्यात रेल्वेत घडलेल्या काही अप्रिय घटनांच्या पार्श्वभूमीवर तपासणी व गस्त वाढविण्यात आली आहे. गस्तीच्या वेळी ही संशयास्पद वस्तू आढळून आली.
सुरुवातीला स्थानिक पातळीवर त्याची चौकशी करण्यात आली. त्या ट्रान्समीटरवर ‘महाराष्ट्र शासन मत्स्य व्यवसाय विभाग’ असे लिहिले होते. तसेच ‘आपत्कालीन परिस्थितीत बटण दाबा, एलईडी लाईट चमचम करेल’ असे मराठीत लिहिले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना यासंबंधीची माहिती देऊन तपास हाती घेण्यात आला. या ट्रान्समीटरमध्ये स्फोटके आहेत का? घातपाताचा प्रयत्नांचा एक भाग म्हणून रेल्वेरूळावर हा ट्रान्समीटर ठेवण्यात आला आहे का? याची चौकशी करण्यासाठी श्वानपथक व स्फोटकतज्ञांना पाचारण करण्यात आले. रात्री त्यांनी या ट्रान्समीटरमध्ये धोकादायक असे काही नसल्याचा निर्वाळा देताच रेल्वे पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.