वृत्तसंस्था/ चार्ल्सस्टन
युक्रेनची 28 वर्षीय महिला टेनिसपटू इलिना स्विटोलिनाला सोमवारी येथे झालेल्या डब्ल्यूटीए टूरवरील चार्ल्सस्टन खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पहिल्याच फेरीत पुतीनसेवाकडून हार पत्करावी लागली.
महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत सामन्यात युलिया पुतिनसेवाने स्विटोलिनाचा 6-7(3-7), 6-2, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले. हा सामना जवळपास तीन तास चालला होता. आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रामध्ये तब्बल एक वर्षानंतर स्विटोलिनाने या स्पर्धेत आपले पुनरागमन केले होते. गेल्या ऑक्टोबरमध्ये स्विटोलिनाला पहिले अपत्य प्राप्त झाले होते. तिने आपल्या मुलीचे नाव स्केई असे ठेवले होते. स्विटोलिनाने फ्रान्सचा टेनिसपटू गेल माँटिन्सबरोबर विवाह केला होता.
या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात स्लोनी स्टिफेन्सने लुसिया चिरिकोचा 3-6, 6-1, 6-2, फ्रुव्हर्टटोव्हाने टिचमनचा 6-2, 3-6, 6-2, कॅलिन्सस्कायने कॅलिनिनाचा 7-6(7-6), 6-4, कॅथ्रेनी सिबोव्हने लॉरेन डेव्हिसचा 4-6, 6-1, 6-2, बिनकोव्हाने बाँडेरचा 7-6(7-5), 6-2 असा पराभव करत दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले.