लोकसभा अध्यक्ष दौऱयावर ः
वृत्तसंस्था/ मेक्सिको सिटी
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शनिवारी मेक्सिकोमध्ये स्वामी विवेकानंद यांच्या पुतळय़ाचे अनावरण केले आहे. मानवतेसाठी त्यांनी केलेले मार्गदर्शन भौगोलिक अडथळय़ांना ओलांडणारे असल्याचे उद्गार बिर्ला यांनी यावेळी काढले आहेत.
दक्षिण अमेरिकेत स्वामी विवेकानंद यांचा हा पहिलाच पुतळा आहे. हा पुतळा लोकांसाठी, विशेषकरून तरुणाईसाठी परिवर्तन घडवून आणण्याकरता प्रेरणेचा स्रोत ठरणार असल्याचे बिर्ला यांनी म्हटले आहे. ओम बिर्ला हे मेक्सिकोत भारतीय संसदीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत.
लोकसभा अध्यक्षांनी यापूर्वी शुक्रवारी स्वातंत्र्यसेनानी डॉ. पांडुरंग खानखोजे यांच्या मेक्सिकोतील चापिंगो विद्यापीठातील पुतळय़ाचे अनावरण केले होते. दक्षिण अमेरिकेतील सर्वात जुने कृषी विद्यापीठ चापिंगो विद्यापीठाची त्यांनी पाहणी केली आहे.
मेक्सिकोच्या सँटियागो क्रेलमध्ये चेंबर ऑफ डेप्युटीजच्या अध्यक्षांची बिर्ला यांनी भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांनी परस्पर महत्त्वाच्या अनेक मुद्दय़ावर चर्चा केली आहे. मेक्सिको हा भारताला एक स्वतंत्र देश म्हणून मान्यता देणारा पहिला देश होता. व्यापार, अर्थव्यवस्था आणि संस्कृतीप्रकरणी दोन्ही देशांमधील संबंध मजबूत झाल्याचे बिर्ला यांनी म्हटले आहे. लोकसभा अध्यक्षांनी मेक्सिकोच्या संसद परिसरात भारत-मेक्सिको मैत्री उद्यानाचे उद्घाटन केले होते.