जो बिडेन यांचे आश्वासन : तुर्कियेला विरोध सोडून देण्याचे आवाहन
वृत्तसंस्था/ कोलोराडो
फिनलंडनंतर आता स्वीडन देखील लवकरच नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (नाटो)मध्ये सामील होणार आहे. कोलोराडो येथे युएस एअरफोर्स अकॅडमीला गुरुवारी संबोधित करताना अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांची याची घोषणा केली आहे. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला करून नाटोत फूट पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही अद्याप मजबूत आहोत. फिनलंड नाटोमध्ये सामील झाल्याने आम्ही अधिक सशक्त झालो आहोत आणि लवकरच स्वीडन देखील आमच्यासोबत असेल असे आश्वासन देतो असे बिडेन यांनी म्हटले आहे.
चीनकडून आमच्यासमोर निर्माण करण्यात येणाऱ्या आव्हानांना घाबरून आम्ही मागे हटणार नाही. चीनसोबत संघर्षाची आमची इच्छा नाही, परंतु कठोर मुकाबल्यासाठी आम्ही सज्ज आहोत असे बिडेन यांनी म्हटले आहे. तर हवामान बदलसारख्या जागतिक आव्हानांकरता अमेरिका आणि चीन एकत्र येत काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
तुर्किये अन् हंगेरीचा विरोध
नॉर्डिक देशांना नाटोत सामील करण्यावरून तुर्किये अन् हंगेरी सातत्याने विरोध करत आहेत. परंतु बिडेन आता याप्रकरणी दोन्ही देशांचे मतपरिवर्तन करण्यास यश मिळाल्याचे संकेत दिले आहेत. एर्दोगान हे तुर्कियेचे अध्यक्ष म्हणून पुन्हा निवडून आल्यावर बिडेन यांनी सोमवारी त्यांचे अभिनंदन केले होते. यावेळी एर्दोगान यांनी अमेरिकेकडून एफ-16 लढाऊ विमान खरेदी करण्याची इच्छा पुन्हा व्यक्त केली होती. तर याच्या बदल्यात तुर्कियेला नाटोमधील स्वीडनच्या प्रवेशाला सहमती दर्शविण्याचे आवाहन करण्यात आल्याचे मानले जात आहे.
जुलैमध्ये नाटोची शिखर परिषद
नाटोमधील स्वीडनच्या प्रवेशाप्रकरणी लवकरच एर्दोगान यांच्याशी पुन्हा चर्चा करणार असल्याचे बिडेन यांनी सांगितले आहे. नाटो शिखर परिषद जुलै महिन्यात लिथुआनियाच्या विलनियस येथे पार पडणार आहे. अमेरिकेचे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन यांनी मंगळवारी तुर्कियेला नाटोमधील स्वीडनच्या प्रवेशाला लवकरात लवकर अंतिम स्वरुप देण्याचे आवाहन केले होते. स्वीडनने स्वत:च्या सदस्यत्वासाठी यापूर्वीच तुर्कियेचे आक्षेप दूर करण्यासाठी आवश्यक पावले उचलली आहेत असे ब्लिंकेन यांनी म्हटले आहे.
युक्रेनच्या सदस्यावर निर्णय घ्यावा
दुसरीकडे युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की हे मोल्दोवामध्ये युरोपीय देशांच्या एका बैठकीत सामील झाले. युरोपीय महासंघ आणि नाटोने युक्रेनच्या सदस्यत्वाबद्ददल लवकर निर्णय घ्यावा. रशियासोबत सीमा असणाऱ्या प्रत्येक देशाला युरोपीय महासंघ अन् नाटोमध्ये सामील करण्यात यावे असे झेलेंस्की यांनी म्हटले आहे.
बिडेन व्यासपीठावर कोसळले
बिडेन हे कोलोराडो येथील एअरफोर्स अकॅडमीच्या कार्यक्रमादरम्यान खाली पडले आहेत. खाली पडल्यावर एअरफोर्स अधिकाऱ्यांनी त्यांना उठून उभे राहण्यास मदत केली. अध्यक्ष बिडेन हे ठीक असून त्यांना ईजा झाली नसल्याचे व्हाइट हाउसकडून सांगण्यात आले.