अगसगे गु•ादेवी येथे मधमाशांचा भाविकांवर हल्ला : भांडी टाकून काढावा लागला पळ
बेळगाव : उंदीरबीजनिमित्त अगसगे येथील सीमेवर असणाऱ्या गु•ादेवी मंदिर परिसरात मांसाहरी भोजन करण्यात आले होते. यावेळी मंदिरात असणाऱ्या भल्या मोठ्या सावरीच्या वृक्षावरील मधमाशांनी मांसाहारी खवय्यांची चांगलीच फजिती केल्याची घटना बुधवारी घडली. मटणाची गोडी आणि पळताभुई थोडी… अशी अवस्था झाली होती. यामुळे गावात मधमाशांच्या दंशाची घटना चांगलीच रंगली होती. श्रावण मासानिमित्त महिनाभर मांसाहार पूर्णपणे वर्ज्य केले जाते. त्यामुळे गणेशोत्सवानंतर येणाऱ्या उंदीरबीजकडे सर्व मांसाहारी खवय्यांचे लक्ष लागून असते. अगसगे येथे सालाबादप्रमाणे गु•ादेवी सीमेवर उंदिरीबीज साजरी केली जाते. गु•ादेवी परिसरात शेती असणाऱ्या शेतकऱ्यांकडून तसेच देवीकडे नवस बोललेल्या भाविकांकडून बकऱ्याचा मान देऊन नवस फेडला जातो. अशाचप्रकारे बुधवारी काही शेतकरी उंदिरीबीज करण्यासाठी सर्व तयारीनिशी गेले होते.
महिन्याभरानंतर मटणावर ताव मारण्यासाठी सर्वजण उत्साही झाले होते. गु•ादेवी येथे देवीला बकऱ्याचा मान देऊन शेतकऱ्यांनुसार वाटे घालण्यात आले. यानंतर रक्तीचा प्रसाद करण्यासाठी चुली पेटविण्यात आल्या. झाडाखाली चूल पेटली खरी पण झाडावर असणाऱ्या मधमाशांच्या पोळ्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते. चुलीवर भांडीही ठेवण्यात आली. तितक्यात चुलीच्या धुरामुळे झाडावरील मधमाशा जागे झाल्या. झाडावरील मधमाशांनी घोंगावत खाली असणाऱ्या भाविकांवर हल्ला चढविला. माशांना हुसकावण्यासाठी हातवारे करत अनेकांनी पळ काढला. हातवारे करणाऱ्यांचा पाठलाग करून मधमाशांनी दंश केला. त्यामुळे साऱ्यांनी भांडी टाकून पळ काढण्यात धन्यता मानली. शेजारी असणाऱ्या बेकिनकेरे गावच्या शेतवडीतील काजू बागायतीमध्ये पळून जाईपर्यंत पुरेवाट झाली. झाडांचा आडोसा घेऊन अनेकांनी आपली सुटका करून घेतली. सदर घटनेमुळे गावामध्ये चांगलाच हशा पिकला आहे. गावात चौकाचौकात घटनेची चर्चा रंगली आहे.
मद्यपींची झाली फजिती
बकऱ्याचा मान दिल्यानंतर वाटे घालण्यात आले. रक्तीचा नैवेद्य तयार करण्यासाठी काहीजण गुंतले होते. तर काही मद्यशौकीन ठिकठिकाणी आपले नियोजन करून बैठक मारली होती. मधमाशांचे पोळे उठताच मद्याचे पेले घेऊन पळ काढला. यामुळे मद्यपींची झालेली फजिती पाहून अनेकांना हसू आवरणे कठीण झाले होते.