प्रेंच ओपन टेनिस ग्रँडस्लॅम चॅम्पियनशिप : आंद्रे रुबलेव्ह, होल्गर रुने, दारिया कॅसात्किना यांचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था /पॅरिस
क्रोएशियाच्या मारिन सिलिकने 33 बिनतोड सर्व्हिसची नोंद करीत रशियाच्या आंद्रे रुबलेव्हनचे आव्हान संपुष्टात आणून पहिल्यांदाच पेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविले. त्याचप्रमाणे नॉर्वेच्या कॅस्पर रूडने आपल्या पहिल्या ग्रँडस्लॅममध्ये उपांत्य फेरी गाठताना डेन्मार्कच्या होल्गर रुनेचा पराभव केला. महिला एकेरीत अग्रमानांकित इगा स्वायटेकने कॅसात्किनाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली आहे.
2014 चा अमेरिकन ओपन चॅम्पियन असणाऱया सिलिकने रुबलेव्हवर पाच सेट्सच्या संघर्षपूर्ण लढतीत 5-7, 6-3, 6-4, 3-6, 7-6 (10-2) अशी मात केली. सुमारे सव्वाचार तास ही झुंज रंगली होती. या स्पर्धेत पहिल्यांदाच त्याने शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले असून चारही ग्रँडस्लॅम स्पर्धांची उपांत्य फेरी गाठणारा तो क्रोएशियाचा पहिला टेनिसपटू बनला आहे. शुक्रवारी त्याची उपांत्य लढत आठव्या मानांकित कॅस्पर रूडशी होईल. एटीपी मानांकनात रुबलेव्ह 23 व्या क्रमांकावर आहे. पाच सेट्समध्ये रंगलेल्या या लढतीत रुबलेव्हने पहिला व चौथा तर सिलिकने दुसरा, तिसरा व निर्णायक सेट जिंकला. आधीच्या फेरीत सिलिकने दुसऱया मानांकित मेदवेदेव्हला नमविले होते. यापूर्वी 2017 व 2018 मध्ये त्याने या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. रुबलेव्हने आधीच्या फेरीत यानिक सिनरचा पराभव केला होता. गेल्या एप्रिलमध्ये रुबलेव्हने जोकोविचला चकित करून सर्बिया ओपन स्पर्धा जिंकली होती.
कॅस्पर रूडची रुनेवर मात
अन्य एका उपांत्यपूर्व सामन्यात पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठताना 23 वर्षीय कॅस्पर रूडने डेन्मार्कच्या 19 वर्षीय होल्गर रुनेचा चार सेट्समध्ये 6-1, 4-6, 7-6 (7-2) असा पराभव केला. रूडने आजवर आठ स्पर्धा जिंकल्या असून पहिले ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी त्याला आणखी दोन सामने जिंकण्याचे आव्हान पार करावे लागणार आहे. त्याला क्ले-कोर्टवरील स्पेशालिस्ट खेळाडू मानले जाते. त्याने 2020 पासून क्ले-कोर्टवर आजवर 65 सामने जिंकले असून रुनेला एकूण चारवेळा हरविले आहे. रुनेने आधीच्या फेरीत सित्सिपसचे आव्हान संपवले होते. शुक्रवारी दुसरा उपांत्य सामना 13 वेळा ही स्पर्धा जिंकणारा राफेल नदाल व जर्मनीचा अलेक्झांडर व्हेरेव्ह यांच्यात होईल.
स्वायटेक अंतिम फेरीत
महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात पोलंडच्या इगा स्वायटेकने अंतिम फेरी गाठली. तिने उपांत्य लढतीत रशियाच्या 20 व्या मानांकित दारिया कॅसात्किनाचा 6-2, 6-1 असा धुव्वा उडविला. मार्टिना टेव्हिसन व कोको गॉफ यांच्यातील विजयी खेळाडूशी स्वायटेकची जेतेपदाची लढत शनिवारी होईल.