माइया-साबालेन्का पराभूत
वृत्तसंस्था/ पॅरिस
फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत अग्रमानांकित पोलंडच्या इगा स्वायटेकने ब्राझीलच्या बियाट्रिझ हदाद माइयाचे आव्हान संपुष्टात आणत महिला एकेरीची अंतिम फेरी गाठली. तिला सलग दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्याची संधी मिळाली आहे. तिच्याप्रमाणे बिगरमानांकित कॅरोलिना मुचोव्हानेही अंतिम फेरी गाठता दुसऱ्या मानांकित बेलारुसच्या आर्यना साबालेन्काचा स्वप्नभंग केला.
स्वायटेकने उपांत्य लढतीत 14 व्या मानांकित बियाट्रिझ हदाद माइयाचा 6-2, 7-6 (9-7) असा पराभव करून अंतिम फेरीत स्थान मिळविले. शनिवारी तिची जेतेपदाची लढत झेक प्रजासत्ताकच्या बिगरमानांकित कॅरोलिना मुचोव्हाशी होईल. मुचोव्हाने अतिशय चुरशीच्या झालेल्या उपांत्य लढतीत साबालेन्कावर 7-6 (7-5), 6-7 (5-7), 7-5 अशी मात केली. तीन तास 13 मिनिटे ही झुंज रंगली होती. ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठण्याची मुचोव्हाची ही पहिलीच वेळ आहे. तिसऱ्या सेटमध्ये ती 2-5 असे पिछाडीवर पडल्यानंतर मॅचपॉईंट वाचविला. त्यानंतर सलग पाच गेम्स जिंकत तिने अंतिम फेरीतील स्थानही निश्चित केले.
पहिल्या सेटमध्ये 5-4 वर असताना मुचोव्हाला सेटपॉईंटचा लाभ घेता आला नाही. पण टायब्रेकमध्ये तिने पिछाडी भरून काढत दुसऱ्या सेटपॉईंटवर सेट जिंकला. दुसरा सेटही अतिशय चुरशीचा झाला आणि टायब्रेकरपर्यंत लांबलेला हा सेट साबालेन्काने जिंकून बरोबरी साधली होती. निर्णायक सेटमध्ये मुचोव्हाने सलग पाच गेम्स जिंकत सेटसह सामना जिंकला. मुचोव्हाने पाचही ब्रेकपॉईंटचा लाभ घेतला तर साबालेन्का 13 पैकी फक्त 4 ब्रेकपॉईंटचा लाभ घेऊ शकली.
मियू काटो-टिम प्युएट्झ मिश्र दुहेरीत अजिंक्य
जपानची मियू काटो व तिचा जर्मनीचा साथीदार टिम प्युएट्झ यांनी फ्रेंच ओपन स्पर्धेत मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकावले. अंतिम लढतीत त्यांनी बियान्का अँड्रीस्क्यू व मायकेल व्हीनस यांचा 4-6, 6-4, (10-6) असा पराभव केला.
बियान्का व व्हीनस यांनी अडखळत सुरुवात करीत पहिला सेट जिंकण्यात यश मिळविले. दुसऱ्या सेटमध्ये सर्व्हिसप्रमाणे गुण मिळत गेले. काटो-टिम यांनी त्यांना 4-4 वर गाठल्यानंतर त्यांनी 5-4 अशी आघाडी घेतली. नंतर टिमने दोन ब्रेकपॉईंट वाचवत हा सेट टायब्रेकरवर नेला. टायब्रेकमध्येही दोन्ही जोड्यांनी चांगली झुंज दिली. पण काटो-टिम यांनी अखेर 10-6 अशी बाजी मारत जेतेपद पटकावले. विशेष म्हणजे काटोने अनवधानाने मारलेला चेंडू बॉलगर्लला लागल्यानंतर तिला महिला दुहेरीच्या लढतीतून अपात्र ठरविण्यात आले होते.