वृत्तसंस्था /पॅरिस
जागतिक अग्रमानांकित व विद्यमान विजेती पोलंडची इगा स्वायटेक, जर्मनीचा अलेक्झांडर व्हेरेव्ह, नॉर्वेचा कॅस्पर रुड यांनी प्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत एकेरीची उपांत्य फेरी गाठली. अमेरिकेची कोको गॉफ, अर्जेन्टिनाचा टॉमस मार्टिन एचेव्हेरी व डेन्मार्कचा होल्गर रुने यांचे आव्हान संपुष्टात आले. इगा स्वायटेकने अमेरिकेच्या सहाव्या मानांकित कोको गॉफचे आव्हान 6-4, 6-2 असे संपुष्टात आणत शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले. चुरशीची झालेली ही लढत सुमारे दीड तास रंगली होती. उपांत्य फेरीत तिची लढत ब्राझीलच्या 14 व्या मानांकित बियाट्रिझ हदाद माइयाशी होईल. माइयाने सातव्या मानांकित ट्युनिशियाच्या ऑन्स जेबॉरचा पराभव करून याआधीच उपांत्य फेरी गाठली होती. गॉफला स्वायटेकविरुद्ध अद्याप एकही सेट जिंकता आलेला नाही. पहिल्या सेटमध्ये तिने स्वायटेकच्या बरोबरीने खेळ केला. मात्र ती सेट जिंकू शकली नाही. दुसऱ्या सेटमध्ये स्वायटेकने वर्चस्व कायम राखत सेटसह सामना जिंकून गॉफला स्पर्धेबाहेर घालविले. पुरुष एकेरीत जर्मनीच्या अलेक्झांडर व्हेरेव्हने शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविताना अर्जेन्टिनाच्या टॉमस मार्टिन एचेव्हेरीचा कडवा प्रतिकार 6-4, 3-6, 6-3. 6-4 असा मोडून काढला. तीन तास 22 मिनिटे ही लढत रंगली होती. व्हेरेव्हला अद्याप एकही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकता आलेली नसून ते साध्य करण्यासाठी त्याला आणखी दोन लढती जिंकाव्या लागणार आहेत. त्याची उपांत्य लढत कॅस्पर रुडशी शुक्रवारी होणार आहे. अन्य एका रंगतदार ठरलेल्या सामन्यात चौथ्या मानांकित कॅस्पर रुडने होल्गर रुनेवर संघर्षपूर्ण विजय मिळविला. रुडने रुनेवर 6-1, 6-2, 3-6, 6-3 अशी मात केली.