आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाकडून सहयजमान अमेरिकेतील स्थळांवर शिक्कामोर्तब
वृत्तसंस्था/ दुबई
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने (आयसीसी) बुधवारी आयसीसी पुरुषांच्या टी20 विश्वचषक स्पर्धेच्या अमेरिकेतील टप्प्यासाठी न्यूयॉर्क, डलास आणि फ्लोरिडा ही तीन ठिकाणे असतील यावर शिक्कामोर्तब केले. ब्रॉवर्ड काउंटी (फ्लोरिडा), ग्रँड प्रेयरी (डलास) आणि आयसेनहॉवर पार्क (न्यूयॉर्क) या तीन स्टेडियमवर अमेरिकेतील सामने आयोजित केले जाणार आहेत.
ही स्पर्धा पहिल्यांदाच अमेरिकेमध्ये खेळवली जाणार आहे आणि ते वेस्ट इंडिजसह सहयजमान म्हणून जबाबदारी पेलतील. आयसीसीने 2021 मध्ये अमेरिकेला या स्पर्धेचे यजमानपद बहाल केले होते. आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉफ अॅलार्डिस यांनी सांगितले की, व्यापक मूल्यांकन प्रक्रियेनंतर ही ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. ‘आम्हाला अमेरिकेतील तीन स्थळांची घोषणा करताना आनंद होत आहे, जी आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या आयसीसी पुऊषांच्या टी20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करतील. यामध्ये 20 संघ उतरून चषकासाठी लढतील’, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘आम्ही देशातील अनेक संभाव्य ठिकाणांचे पर्याय पडताळून पाहिले आणि या स्पर्धेबद्दल यजमानांमध्ये निर्माण झालेल्या उत्साहामुळे आम्हाला खूप प्रोत्साहन मिळाले आहे’, असे अॅलार्डिस यांनी म्हटले आहे. फ्लोरिडा आणि डलास येथील विद्यमान स्थळांचा विस्तार केला जाणार असून ‘मॉड्युलर स्टेडियम’ उपायांचा वापर करून अधिक क्रिकेट रसिक, मीडिया आणि आदरातिथ्य क्षेत्रे यांना सामावून घेतले जाईल. त्याच तंत्रज्ञानाचा वापर नॅसाऊ काउंटी, न्यूयॉर्क येथे 34 हजार आसनक्षमतेचा मॉड्युलर स्टेडियम तयार करण्यासाठी केला जाईल, असे त्यांनी सांगितले आहे. यासाठी पुढील महिन्यापर्यंत स्थानिक अधिकारिणींकडून आवश्यक मान्यता मिळण्याची आशा अॅलार्डिस यांनी व्यक्त केली आहे.
‘मॉड्युलर स्टेडियम तंत्रज्ञान वापरण्याच्या संधीबद्दल आम्ही खूप उत्सुक आहोत. हे तंत्रज्ञान स्थळाची क्षमता वाढवण्यासाठी यापूर्वीच्या आयसीसी स्पर्धांवेळी वापरले गेले आहे आणि जगभरात इतर प्रमुख खेळांच्या बाबतीत ते नियमित वापरले जाते. अमेरिकेत ते आम्हाला डलास आणि फ्लोरिडा या दोन्ही ठिकाणी स्थळांचा आकार वाढवण्याची आणि न्यूयॉर्कमध्ये एक जबरदस्त ठिकाण साकारण्याची संधी देईल’, असे अॅलार्डिस यांनी म्हटले आहे.
वॉशिंग्टनमधील जॉर्ज मेसन विद्यापीठ, एमएलसी टीम वॉशिंग्टन फ्रीडमचे नवीन स्थळ यासह अमेरिकेतील इतर अनेक ठिकाणे देखील सामनापूर्व उपक्रम राबविण्यासाठी आणि सराव करण्यासाठी संभाव्य ठिकाणे म्हणून पाहिली गेली आहेत. आयसीसीच्या घोषणेने अमेरिकेच्या टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाविषयीच्या तसेच तेथील स्टेडियम वेळेत तयार होतील की नाही याबद्दलच्या सर्व चिंता देखील दूर केल्या आहेत.