भारताचा कॅनडाला आग्रह : 20 खलिस्तानवादी दहशतवाद्यांची सूची सादर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कॅनडामध्ये वास्तव्य करणाऱ्या आणि भारताविरोधात हिंसक कारवाया करणाऱ्या 20 खलिस्तानवादी दहशतवाद्यांची सूची भारताने कॅनडा प्रशासनाला सादर केली आहे. या सूचीच्या आधारावर या दहशतवाद्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी आग्रही मागणीही भारताने केली आहे. भारताने या संदर्भातील विश्वासार्ह पुरावेही सादर केले आहेत, असे भारताच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी कॅनडातील खलिस्तानवादी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमध्ये भारताचा हात असल्याचा आरोप केला होता. भारताचे या आरोपाचा स्पष्ट आणि ठाम इन्कारही केला होता. तसेच ट्रूडो यांनी त्यांच्या सत्ताकारणासाठी हा बेछुट आणि बिनबुडाचा आरोप केला आहे, असा प्रतिवारही केला होता. या संदर्भात भारताने ही सूची सादर केली आहे.
26 वेळा मागणी
कॅनडामध्ये भारतविरोधी कारवाया करणाऱ्या अनेक खलिस्तानवादी दहशतवाद्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी भारताने पूर्वीपासून केली आहे. गेल्या 20 वर्षांमध्ये अशी मागणी 26 वेळा करण्यात आली आहे. मात्र, कॅनडाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने खलिस्तानवादी दहशतवाद कॅनडामध्ये फोफावला आहे, असे स्पष्टीकरण भारताने अनेकदा केलेले असूनही कॅनडा दुर्लक्ष करीत आहे.
पुरावे दिलेच नाहीत
कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो यांनी भारतावर पुन्हा आरोप केले आहेत. तथापि, त्यांनी कोणतेही पुरावे अद्याप दिलेले नाहीत. कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही केवळ आरोप करण्यात आले. पत्रकारांनी अनेकदा विचारुनही कोणताही पुरावा उघड करण्यात आला नाही. त्यामुळे कॅनडाच्या आरोपांविषयीच संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे आरोप राजकीय असल्याचे दिसत आहे.
लोकप्रियतेला घसरण
ट्रूडो यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागल्याचे दिसून येत आहे. त्यांनी भारतावर केलेल्या आरोपांच्या नंतर घेण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात त्यांनी पंतप्रधानपदावरुन दूर व्हावे असे 60 टक्के कॅनडावासियांना वाटते, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यांच्या पक्षाची लोकप्रियताही घसरली आहे. त्यामुळे स्वत:चे राजकीय भवितव्य सावरण्यासाठी ते भारतावर आरोप करीत आहेत का ? असा प्रश्न आता त्यांच्या देशातच त्यांना विचारला जाऊ लागला आहे.
पुराव्यांचा दावा
भारताविरोधात आपल्याकडे पुरावे आहेत असा दावा पुन्हा त्यांनी केला आहे. भारताच्या कॅनडातील अधिकाऱ्यांनी फोनवरुन एकमेकांशी केलेला संवाद ध्वनिमुद्रित करण्यात आला आहे, असे कॅनडाच्या काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या संवादातून काही पुरावे समोर येतात असाही दावा करण्यात येतो. पण असे कोणतेही ध्वनिमुद्रण सादर करण्यात आलेले नाही. या संदर्भात चर्चा करण्यासाठी ऑगस्ट आणि सप्टेंबरात कॅनडाचे उच्चपदस्थ अधिकारी भारतात आले होते, असेही वृत्त प्रसिद्ध झालेले आहे. यासंबंधातील काही माहिती ‘फाईव्ह आईज’ संघटनेतील एका देशाने आपल्याला दिली असेही कॅनडाचे म्हणणे आहे.
भारताची ठाम भूमिका
ट्रूडो त्यांच्या राजकीय कारणांसाठी भारतावर आरोप करीत आहेत, अशी स्पष्ट भूमिका भारताने घेतली आहे. कॅनडात खलिस्तानवादी दहशतवाद फोफावला आहे. तो नियंत्रणात आणण्याचे उत्तरदायित्व कॅनडाचेच आहे. तथापि, ट्रूडो स्वत:च्या सत्ताकारणात मग्न असल्याने ते सातत्याने भारताच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असे भारतातील अनेक आंतरराष्ट्रीय तज्ञांचे मत आहे.