समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांचे निर्देश वनखाते, उपजिल्हाधिकारी, मामलेदारांसह बैठक
प्रतिनिधी / सांगे
भविष्यात नेत्रावळी अभयारण्यातील धबधब्यांच्या ठिकाणी दुर्घटना घडू नयेत म्हणून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश सांगेचे आमदार आणि समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी वन खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. नेत्रावळीतील मैनापी धबधब्यावर बुडून दोघांना मृत्यू येण्याच्या घटनेची गंभीर दखल प्रशासनाने घेऊन सांगे नगरपालिका सभागृहात सांगेचे उपजिल्हाधिकारी मिलिंद्र वेळीप यांनी सर्व संबंधित घटकांची बैठक काल मंगळवारी बोलाविली होती.
यावेळी मंत्री फळदेसाई, उपजिल्हाधिकारी वेळीप, मामलेदार गौरीश गावकर, संयुक्त मामलेदार सीमा गुडेकर व नगराध्यक्षा प्रीती नाईक व्यासपीठावर हजर होत्या.
वनखाते पर्यटकांकडून जेव्हा प्रवेश शुल्क, वाहन फी आकारते, तेव्हा पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेणे ही वन खात्याची जबाबदारी ठरते. त्यामुळे पर्यटकांना सुरक्षा पुरविणे, सहकार्य व योग्य मार्गदर्शन करणे हे वन खात्याचे कर्तव्य ठरते, असे फळदेसाई यांनी सांगितले. धबधब्यांच्या ठिकाणी संदेश देणारे फलक नाहीत. कुठे धोका आहे, कुठे पाण्यात उतरू नये, काय करायचे आणि काय करू नये हे दर्शवणारे फलक त्वरित लावा, असे निर्देश मंत्री फळदेसाई यांनी वनाधिकाऱ्यांना दिले.
गर्दी होऊ देऊ नका
धबधब्यांवर गर्दी होत असल्याने एक वनरक्षक आणि एक जीवरक्षक पुरेसा नसून त्यांची संख्या वाढवा, अशी सूचना फळदेसाई यांनी केली. धबधबे हे निसर्गाचे देणे आहे. त्यामुळे ते बंद करू शकत नाही. परंतु योग्य नियम करून गर्दीवर नियंत्रण आणू शकतो. पर्यटकांना योग्य मार्गदर्शन करा. एकाच वेळी मोठ्या संख्येने पर्यटक न सोडता टप्प्याटप्प्याने सोडून गर्दी होऊ देऊ नका, अशा अनेक सूचना त्यांनी केल्या. फीपोटी जी रक्कम जमा होते त्यातून साधनसुविधा, पर्यटकांना सुरक्षा पुरविण्यावर पैसे खर्च करा. शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पोलीस बंदोबस्त ठेवा, असे निर्देशही मंत्र्यानी दिले.
लवकरच संयुक्त बैठक होणार
यावेळी वन खात्याचे साहाय्यक वनपाल दामोदर सालेलकर यांनी सांगितले की, पर्यटक अभयारण्यात प्रवेश करतात म्हणून फी आकारली जाते. या फीची रक्कम सरकारी तिजोरीत जाते. फीपोटी वार्षिक 10,61,350 ऊ. जमा झाल्याची माहिती त्यांनी दिली. धबधब्याच्या ठिकाणी एक जीवरक्षक आणि एक वनरक्षक तैनात करण्यात आलेला असून स्थानिक पंचायतीला विश्वासात घेऊन सुरक्षा योजना राबविण्यावर विचार चालू आहे. लवकरच मंत्री फळदेसाई, स्थानिक पंचायत आणि वनखाते अशी संयुक्त बैठक घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. वन खात्याच्या माट्टोनी येथील फाटकाजवळ सीसीटीव्ही कॅमेरा बसविलेला आहे, असे सालेलकर यांनी सांगितले.
पर्यटक मोठ्या प्रमाणात नेत्रावळीत येतात, पण पंचायतीला महसूल काही मिळत नाही. त्यामुळे लाईफ जॅकेट्स पंचायतीतर्फे पुरविण्यात आल्यास काही अंशी पंचायतीला महसूल प्राप्त होऊ शकतो, असे याप्रसंगी सांगण्यात आले. रजनी गावकर यांनी देखील चर्चेत भाग घेतला. यावेळी धोकादायक झाडे कापण्याचा मुद्दा चर्चेत आला. फळदेसाई यांनी सुळकर्णा येथे वीजवाहिन्यांवर एक झाड कोसळण्याच्या स्थितीत असून वीज खात्याने त्यावर त्वरित कृती करण्याची गरज असल्याचे सांगितले. वीज खात्याचे साहाय्यक अभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांनी त्वरित याची दखल घ्यावी, असे त्यांनी सूचित केले.