चीनसोबतचा सीमा वाद : दोन्ही देशांदरम्यान सैन्यस्तरीय चर्चा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनसोबतच्या सीमावादावरील चर्चा संपलेली नाही. तीन वर्षांमध्ये दोन्ही देशांदरम्यान यावर चर्चा झाली आहे. वादाच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवरील चर्चेदरम्यान बरीच प्रगती झाली आहे. सीमा वादासंबंधी दोन्ही देशांदरम्यान लवकरच बैठक होणार असल्याचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी सांगितले आहे. 2020 मध्ये लडाखच्या गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली होती.
गलवान खोऱ्यातील हिंसक झटापटीपासून दोन्ही देशांदरम्यान सीमा वाद सोडविण्यासाठी सैन्य स्तरावर निरंतर चर्चा होत राहिली आहे. यापूर्वी 23 एप्रिल रोजी चुशुल मोल्डो सीमेवर भारत आणि चीनच्या सैन्यादरम्यान चर्चेची 18 वी फेरी पार पडली होती.
मागील 9 वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील सरकारने उत्तर सीमेसह सीमावर्ती क्षेत्रांमधील पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे. 2014 नंतर भारताकडून सीमेवर पायाभूत विकासावर भर देण्यात आल्याने चीनकडून देखील प्रत्युत्तरादाखल गस्त वाढविण्यात आल्याचे जयशंकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
भारत-भूतान रेल्वेमार्ग
भूतान आणि आसामदरम्यान रेल्वेमार्ग निर्माण करण्यासंबंधी आम्ही चर्चा करत आहोत. पर्यटकांसाठी आणखी अनेक ठिकाणं खुली करण्यासाठी भूतान अत्यंत उत्सुक आहे. हा प्रकल्प आसामसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. या प्रकल्पाकरता चर्चेच्या 24 फेऱ्या पार पडल्या आहेत. याप्रकरणी आणखी बैठका आयोजित होणार आहेत असे जयशंकर यांनी सांगितले आहे.
कैलास मानसरोवर यात्रा
कैलास मानसरोवर यात्रेसाठी मूलभूत सुविधांची निर्मिती केली जात आहे. या मार्गावर एका भुयाराची गरज असून सीमा रस्ते संघटना (बीआरओ) यावर काम करत आहे. तर जुन्या यात्रामार्गासंबंधी चीनकडून कुठलाच संकेत मिळाला नसल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.
म्यानमार त्रिपक्षीय महामार्ग
म्यानमारमधील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीमुळे त्रिपक्षीय महामार्गाच्या प्रकल्पासमोर आव्हान निर्माण झाले आहे. भारताला प्रकल्प पूर्ण करत म्यानमारच्या सिटवे बंदरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग प्राप्त करण्यासाठी म्यानमारच्या प्रशासनासोबत चर्चा करावी लागणार असल्याचे विदेशमंत्र्यांनी म्हटले आहे.