जॉन अब्राहमसोबतचा पहिला चित्रपट
तमन्ना भाटिया सध्या चर्चेत आहे. ‘लस्ट स्टोरीज 2’मधील स्वत:च्या भूमिकेवरून तिने मोठी प्रसिद्धी मिळविली आहे. तमन्ना आता आणखी एका चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. निखिल अडवाणी दिग्दर्शित वेदा या चित्रपटात तमन्ना भाटियाची एंट्री झाली असून ती जॉन अब्राहमसोबत झळकणार आहे. वेदा या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू झाले असून राजस्थानच्या जोधपूर येथे सर्व कलाकार तळ ठोकून आहेत.
निखिलने तमन्ना या चित्रपटात सामील झाल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली आहे. तमन्नासोबत या चित्रपटात जॉन तसेच शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कहाणी असीम अरोरा यांनी लिहिली असून हा चित्रपट दक्षिणेतील ‘वेदालम’चा हिंदी रिमेक आहे. असीमने यापूर्वी गुमराह, नन्हे जैसलमेर, हीरोज, बेल बॉटम आणि मिशन मजनू यासमवेत अनेक चित्रपटाची कहाणी लिहिली आहे.
निखिल ज्याप्रकारे कहाणी मोठ्या पडद्यावर दर्शवितो, ते कौतुकास्पद आहे. जॉनसोबत काम करण्याची संधी मला पहिल्यांदाच मिळाली आहे. या चित्रपटातील माझी भूमिका प्रेक्षकांना निश्चितच आवडेल असे उद्गार तमन्नाने काढले आहेत.पुढील महिन्यात तमन्नाचा ‘जेलर’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत मोहनलाल आणि जॅकी श्रॉप हे दिग्गज अभिनेत्रे दिसून येतील. या चित्रपटाकडून तमन्नाला मोठ्या अपेक्षा आहेत.