नगरपालिका प्रशासनाचा निर्णय
पणजी : म्हापसा नगरपालिकेतील नगरसेवक तारक आरोलकर यांना राज्याच्या नगरपालिका प्रशासन संचालनालयाने अखेर अपात्र ठरवले आहे. त्याचबरोबर समाज कल्याण खात्याच्या छाननी समितीने आरोलकर यांना देण्यात आलेले ओबीसी जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्याचे निर्देश म्हापसा उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान, आरोलकर हे यापूर्वीच या प्रकरणी उच्च न्यायालयात गेले असून 7 जून रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. म्हापसा पालिका निवडणुकीत आरोलकर यांनी ओबीसी प्रमाणपत्र जोडून राखीव वॉर्डातून रिंगणात उतरुन विजय मिळवला. त्यानंतर फ्रँकी फर्नांडिस यांनी आरोलकरांच्या ओबीसी प्रमाणपत्रास हरकत घेऊन तक्रार नोंदविली. उपजिल्हाधिकारी पातळीवर चौकशी होऊन आरोलकर यांचे प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले. त्यास आरोलकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर मागे झालेल्या सुनावणीत प्रतिवादींच्या वकिलांनी वेळ मागून घेतली आणि पुढील सुनावणी 7 जून रोजी निश्चित केली आहे. ती सुनावणी होण्यापूर्वीच नगरपालिका प्रशासन संचालकांनी आरोलकरांना अपात्र केले आहे. त्यामुळे आता न्यायालय काय ठरवते याकडे लक्ष लागून राहिले आहे.