बालदिनानिमित्त बनले न्यूज अँकर : कॅमेऱ्यासमोर बोलण्याची संधी : उपक्रमाचे सर्वच स्तरांतून भरभरून कौतुक
बेळगाव : ‘नमस्कार…‘तरुण भारत’च्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत’ हा आवाज मागील सहा वर्षांपासून ‘तरुण भारत’च्या युट्यूब चॅनेलवरून प्रसारित होणाऱ्या बुलेटिनमध्ये ऐकावयास येत होता. सोमवारी रात्री मात्र आवाजातील बदलामुळे सारेच जण अवाक् झाले. न्यूज अँकरच्या जागी लहान मुलांचा आवाज ऐकू आल्याने ही नेमकी काय गम्मत आहे, हे जाणून घेण्याचे कुतूहल बेळगावकरांमध्ये जागे झाले. ‘तरुण भारत’ने आपल्या शतकोत्तर वाटचालीत अनेक नवनवीन प्रयोग केले आहेत. असाच एक नाविन्यपूर्ण उपक्रम सोमवारी राबविण्यात आला. मंगळवार दि. 14 रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या बालदिनाचे औचित्य साधून अभिनव उपक्रम राबविण्यात आला. एसकेई सोसायटीच्या ठळकवाडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी चक्क बातम्या दिल्या. त्यामुळे या उपक्रमाचे सर्वच स्तरांतून भरभरून कौतुक होत आहे.
ऑगस्ट 2017 पासून ‘तरुण भारत’च्या युट्यूब चॅनेलवरून रात्री ताज्या बातम्या न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून दिल्या जातात. बेळगाव शहर तसेच जिल्हाभरात घडलेल्या दिवसभरातील घडामोडी बुलेटिनमधून प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असतो. हेच बुलेटिन सोमवारी शालेय विद्यार्थ्यांनी दिले. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, कॅमेऱ्यासमोर कसे बोलायचे? कुठे पहायचे? याची माहिती मिळावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला होता. ठळकवाडी हायस्कूलचा सातवीचा विद्यार्थी अथर्व पवन देसाई, आठवीतील विद्यार्थिनी प्रणाली संदीप धामणेकर, नववीची विद्यार्थिनी अक्षरा विठ्ठल देसाई, दहावीतील विद्यार्थी विशाल महादेव शहापूरकर यांनी बातमीपत्राचे वाचन केले. शाळेचे सहशिक्षक सी. वाय. पाटील यांनी त्यांना मार्गदर्शन केले. बालदिनाचे औचित्य साधून ‘तरुण भारत’ परिवारातर्फे त्यांना भेटवस्तू दिल्या. या विद्यार्थ्यांनी वाचलेल्या बातम्या तुम्हाला पाहायच्या असतील तर खालील क्युआर कोड स्कॅन करू शकता. यावेळी अमित कोळेकर, तौसिफ मुजावर, प्रिया काळे व अन्य सोशल मीडिया सहकारी उपस्थित होते.
अविस्मरणीय अनुभव
आजवर शालेय जीवनात कॅमेऱ्यासमोर बोलण्याची संधी क्वचितच कोणा विद्यार्थ्याला मिळाली असेल. परंतु, ‘तरुण भारत’मुळे लाखो सबस्क्रायबर्सपर्यंत पोहोचण्याची संधी ‘तरुण भारत’ने उपलब्ध करून दिली. हा अनुभव अविस्मरणीय असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगत ‘तरुण भारत’चे आभार मानले. तसेच आयुष्याच्या भावी वाटचालीत या अनुभवाची शिदोरी नक्कीच कामी येईल, अशाही भावना या विद्यार्थ्यांनी यावेळी बोलून दाखविल्या.