वृत्तसंस्था/ लखनौ
भारताच्या महिला मल्ल विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांनी आगामी होणाऱया राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध करत भारतीय चमूमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. येथे राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेसाठी घेण्यात आलेल्या निवड चाचणीमध्ये साक्षी मलिकने सोनम मलिकचा पराभव करत भारतीय संघातील आपले स्थान निश्चित केले. 53 किलो वजन गटात विनेश फोगटने अँटीमचा पराभव करत विजेतेपद पटकाविले. त्याचप्रमाणे तिने राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय संघातील आपले स्थान आरक्षित केले. काही दिवसापूर्वी सोनम मलिकच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती. दरम्यान या चाचणी स्पर्धेत साक्षी मलिकने सोनमचा 8-1 अशा गुणांनी पराभव केला. तत्पूर्वी साक्षीने मनिषावर 7-1 अशी मात करून बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेचे तिकीट निश्चित केले. ही स्पर्धा 28 जुलैपासून सुरू होणार आहे. महिला मल्ल मनिषाने आपल्या वजनगटातील उपांत्य लढतीत संगीता फोगटचा 7-5 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. भारताचा ऑलिंपिक पदक विजेता मल्ल बजरंग पुनियाची संगीता पत्नी आहे. राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय महिला कुस्ती संघामध्ये पूजा गेहलोत, पूजा सिहाग यांनी अनुक्रमे 50 आणि 76 किलो वजनगटातून आपले स्थान निश्चित केले आहे.