डब्ल्यूपीपी, कांतार यांच्या अहवालात माहिती :43 अब्ज डॉलर्सवर पोहचले मूल्य
वृत्तसंस्था/ बेंगळूर
टाटा समूहातील कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस भारतातील सर्वात मूल्यवान कंपनी म्हणून नोंदली गेली आहे. व्यवसाय तंत्रज्ञान क्षेत्रासाठी एक कठीण वर्ष असतानाही टीसीएसने सर्वोत्तम कामगिरी करत आपले अग्रस्थान अभेद्यपणे राखले आहे.
जागतिक स्तरावर डिजिटल बदलांचा लाभ कंपनीने उठवत आपले मूल्य अधिक वाढवले आहे. सलग दुसऱ्या वर्षी 43 अब्ज डॉलर मूल्यासह टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही सर्वात मूल्यवान कंपनी ठरली आहे. डब्ल्यूपीपी आणि कांतार यांच्या ब्रँड झेड या अहवालामध्ये टीसीएसने पहिला क्रमांक पटकावला असल्याचे दिसून आले आहे. या क्रमवारीमध्ये एचडीएफसी, इन्फोसिस आणि एअरटेल यांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा आणि चौथा क्रमांक पटकावला आहे. मागच्या वर्षीही या कंपन्यांचे हेच स्थान होते.
इतर कंपन्या
दुसरीकडे भारतीय स्टेट बँकेने यापूर्वीच्या क्रमांकामध्ये चांगली सुधारणा करत पाचव्या स्थानावर पोहोचण्यामध्ये यश मिळवले आहे. सहाव्या क्रमांकावर आयसीआयसीआय बँकेचा समावेश आहे. यापाठोपाठ 7 व्या स्थानावर एशियन पेंटस्, 8व्या स्थानावर जियो, 9 व्या स्थानावर कोटक महिंद्रा बँक आणि 10 व्या स्थानावर एचसीएल टेक ही कंपनी राहिली आहे.
भारताच्या इतर 75 ब्रँडस्चा विचार करता त्यांचे एकूण ब्रँड मूल्य 379 अब्ज डॉलर इतके राहिले आहे, जे मागच्या वर्षाच्या तुलनेत 4 टक्के घटले आहे. जागतिक अस्थिरता हे यामागचे कारण सांगितले जात आहे.
इतर क्षेत्रांची कामगिरी
ऑटोमोटीव्ह क्षेत्रात टीव्हीएस आणि महिंद्रा या कंपन्या सर्वात आघाडीवर राहणाऱ्या कंपन्या ठरल्या आहेत. टीव्हीएसच्या मूल्यात 59 टक्के इतकी वृद्धी झाली आहे. अनेक यशस्वी उत्पादने लाँच केली असून बीएमडब्ल्यूसोबत 10 वर्षाचा करार केल्याचा कंपनीला फायदा झाला आहे. हॅचबॅक आणि एसयुव्हीची मागणी तसेच इलेक्ट्रिक वाहनांप्रती वाढणारा ग्राहकांचा कल लक्षात घेत महिंद्राने योग्य ते पाऊल उचलले आहे. आपल्या मूल्यात 48 टक्के इतकी वृद्धी कंपनीने केली आहे.
वित्त क्षेत्रात ब्रँडस्चा विचार करता अॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक यांनी मोठा वाटा उचलला असल्याचे दिसून आले आहे. डिजिटल व्यवहारांना देशभरात आलेली गती यामुळे दोन्ही बँकांच्या मूल्यात 6 टक्के वाढ दर्शवली गेली.