वृत्तसंस्था/ मुंबई
भारतामधील सर्वात मोठी आयटी सेवा कंपनी आणि दुसऱया नंबरची सर्वात मौल्यवान फर्म टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) यांनी 31 मार्च 2022 रोजी समाप्त झालेल्या चौथ्या तिमाहीतील नफा कमाईची आकडेवारी घोषित केली आहे. यामध्ये कंपनीला निव्वळ नफा हा वर्षाच्या आधारे 7.3 टक्क्यांनी वधारला असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाढीसोबत हा आकडा 9,926 कोटी रुपयांच्या घरात पोहोचल्याची नोंद करण्यात आली आहे. एक वर्षा अगोदर कंपनीचा निव्वळ नफा हा 9,246 कोटी रुपये राहिला होता.
महसूलात 16 टक्क्यांची तेजी
चौथ्या तिमाही दरम्यान आर्थिक वर्ष 22 मध्ये कंपनीला महसूलामध्ये जवळपास 16 टक्क्यांची वाढ झाली असून वाढीसोबत हा आकडा 50,591 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. कंपनीने प्रथमच महसूलात 50 हजार कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. मागील आर्थिक वर्षात समान कालावधीत 43,706 कोटी इतका महसूल कंपनीला प्राप्त झाला होता.