वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी सूर्यकुमार यादवकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. 23 नोव्हेंबरपासून विशाखापटणम येथील सामन्याने त्याची सुरुवात होईल.
सलामीवीर रुतुराज गायकवाडला या संघाचा उपकर्णधार करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेल्या संघातील केवळ तीन खेळाडूंना या संघात स्थान देण्यात आले आहे. त्यात प्रसिद्ध कृष्णा, इशान किशन व स्वत: सूर्यकुमार यांचा समावेश आहे. रायपूर व बेंगळूर येथे होणाऱ्या शेवटच्या दोन सामन्यांसाठी श्रेयस अय्यर संघात सामील होणार असून गायकवाडकडून तो उपकर्णधारपदाची जबाबदारी घेईल.
पाच सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय टी-20 संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), रुतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार.