फंडपेटीतील रक्कम घेऊन फंडपेटी नजिकच्या रस्त्यावर टाकून पसार
ओटवणे प्रतिनिधी
विलवडे गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरातील फंडपेटी अज्ञात चोरट्याने फोडून आतील रक्कम घेऊन फंड पेटी नजिकच्या रस्त्यावर टाकून पसार झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे विलवडे परिसरात खळबळ उडाली आहे.
बुधवारी सकाळी सुभाष दळवी आपल्या शेताकडे जात असतानाच त्यांना रस्त्यालगत ही फंडपेटी दिसली. ही फंडपेटी माऊली मंदिरातील असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर देवस्थान कमिटी अध्यक्ष बाळकृष्ण, दळवी सरपंच प्रकाश दळवी, सुरेश सावंत आदींसह देवस्थानच्या मानकऱ्यांनी मंदिराकडे धाव घेतली. दोन महिन्यापूर्वीच या देवस्थानच्या मंदिरात पाच दिवसांचा कलशारोहण व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा झाला होता. भाविकांचीही या मंदिरात वर्दळ असते. त्यामुळे या फंडपेटीमध्ये सुमारे ५० हजाराहून अधिक रक्कम असल्याची शक्यता देवस्थान मानकऱ्यानी व्यक्त केली.
या चोरीबाबत बांदा पोलिसात तक्रार दिल्यानंतर बीट अंमलदार श्री तेली, पोलीस कॉन्स्टेबल बाळकृष्ण गवस, श्री नाईक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी या चोरीची माहिती घेतली. या चोरीमध्ये दोन ते तीन चोरट्यांचा समावेश असून रात्री ते पहाटेच्या सुमारास ही चोरी घडल्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने बांदा पोलिसांचा तपास सुरू आहे.