प्रतिनिधी / बेळगाव
अंधाराला दूर सारत जीवनात प्रकाश घेऊन येणारा सण म्हणजे दिवाळी! या दिवाळीसाठी विविध प्रकारच्या आकाश कंदिलांनी व दिव्यांनी बाजारपेठ सजली आहे. यावषी पारंपरिक आकाश कंदिलांसोबत इकोप्रेंडली आकाश कंदील बाजारात दाखल झाले आहेत. बेळगावमध्ये कागदी, कार्डबोर्ड, जाड पेपर, कापड, प्लायवूड यामध्ये विविध आकारांमध्ये आकाश कंदील उपलब्ध होत असून, खरेदीसाठी झुंबड उडाली आहे.
दिवाळीमध्ये सर्वाधिक मागणी असते ती आकाश कंदिलांना. बेळगाव शहरातील पांगुळ गल्ली, गणपत गल्ली, मारुती गल्ली परिसरात आकाश कंदिलांनी दुकानांना दिवाळीचा साज चढला आहे. दिवाळी अवघी चार दिवसांवर येऊन ठेपली असल्याने खरेदीचा उत्साह आहे.
पूर्वी बांबूपासून आकाश कंदील तयार केला जायचा. काळानुरुप यामध्ये बदल झाला आणि मागील आठ-दहा वर्षांत प्लास्टिकचे आकाश कंदील बाजारात आले. हे आकाश कंदील अनेक वर्षे टिकत असल्यामुळे त्यांना मागणीही वाढली होती.
सध्या सर्वच प्रकारांमध्ये इकोप्रेंडलीचे वारे वाहत आहेत. प्लास्टिकमुळे होत असलेले नुकसान नागरिकांच्या लक्षात आल्याने इकोपेंडलीची मागणी वाढत आहे. मागील दोन वर्षात कोरोनाच्या संकटामुळे साध्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली होती. यावषी मात्र जल्लोषात दिवाळीचे स्वागत केले जाणार असल्याने जय्यत तयारी सुरू आहे. पारंपरिक आकाश कंदील 100 ते एक हजार रुपयांपर्यंत दुकानांमध्ये विक्री केले जात
आहेत. शोभेचे लहान आकाश कंदील 30 ते 300 रुपयांपर्यंत विकले जात आहेत. गणपत गल्ली व पांगुळ गल्ली येथे खरेदीसाठी नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आहे.