सागरी सीमेवर परस्परांवर केला गोळीबार
वृत्तसंस्था/ सोल
दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियाने सोमवारी वादग्रस्त पश्चिम सागरी सीमेवर परस्परांना इशारा देत गोळीबार केला आहे. दोन्ही देशांच्या सैन्याने ही माहिती दिली आहे. उत्तर कोरियाच्या अलिकडच्या शस्त्रास्त्र परीक्षणाच्या पार्श्वभूमीवर गोळीबाराची ही घटना घडल्याने तणाव वाढला आहे.
दक्षिण कोरियाच्या नौदलाने उत्तर कोरियाच्या एका व्यापारी जहाजाला रोखण्यासाठी इशाऱयादाखल गोळीबार केला. उत्तर कोरियाच्या जहाजाने सोमवारी पहाटे आमच्या सागरी सीमेचे उल्लंघन केले होते असा दावा दक्षिण कोरियाच्या ‘जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ’ने केला आहे.
दक्षिण कोरियाच्या गोळीबारानंतर प्रत्युत्तरादाखल कारवाई करत 10 तोफगोळे डागल्याचे उत्तर कोरियाच्या सैन्याने म्हटले आहे. दक्षिण कोरियाच्या नौदलाने आमच्या क्षेत्रात घुसखोरी केल्याचा आरोप उत्तर कोरियाने केला आहे. कोरियन उपखंडावर योग्य पद्धतीने सागरी सीमा निश्चित करण्यात न आल्याने दोन्ही देशांदरम्यान शत्रुत्व निर्माण झाले आहे. या अनिश्चित सागरी सीमुळे दोन्ही देशाच्या नौदलांदरम्यान अनेकदा हिंसक संघर्ष झाला आहे.
दक्षिण कोरियाकडून युद्धाभ्यास
कोरियन उपखंडात उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र परीक्षणामुळे तणावाची स्थिती आहे. याचदरम्यान मागील आठवडय़ात दक्षिण कोरियाने सैन्याभ्यास केला आहे. या सैन्याभ्यासामुळे उत्तर कोरियाडून अण्वस्त्रांच्या वापराचा धोका वाढला आहे. उत्तर कोरियाने शुक्रवारी सीमेनजीक तोफांचा सराव करत लढाऊ विमानांचे उड्डाण करविले होते.