पुतळा अनधिकृत असल्याचा प्रशासनाचा दावा : आज बागलकोट बंदची हाक
वार्ताहर /जमखंडी
बागलकोट येथील लायन सर्कल जवळील सोनार वसाहतीमध्ये प्रतिष्ठापना करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनधिकृत असल्याच्या कारणावरून जिल्हा प्रशासनाने हटविल्याने तणाव निर्माण झाला आहे. काही हिंदू संघटनांनी विरोध व्यक्त करण्यास प्रारंभ करताच घटनास्थळी जिल्हा पोलीसप्रमुख जयप्रकाश यांनी भेट दिली. दरम्यान विधान परिषद माजी सदस्य नारायणसा भांडगे व पोलीस अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. काहींनी धरणे आंदोलन सुरू केले. पालिका प्रशासनाची परवानगी न घेता पुतळा स्थापन करण्यात आला असून अनधिकृत असल्याने हटवण्याची कारवाई करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. कारवाई करण्याअगोदर खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदीचा आदेश जिल्हाधिकारी जानकी के एम यांनी शुक्रवार दि. 18 च्या मध्यरात्रीपर्यंत जारी केला होता.
पोलीस अधिकाऱ्यांनी निदर्शने करणाऱ्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला व चर्चेस येण्याचे आवाहन केले. पण निदर्शकांनी यास नकार दिला. दरम्यान साहाय्यक जिल्हा पोलीसप्रमुख प्रसन्न देसाई, सीपीआय नागरे•ाrसह मोठा पोलीस बंदोबस्त दाखल झाला. पोलिसांनी बळाचा वापर करून काहींना ताब्यात घेतले. बागलकोट येथे शनिवार दिनांक 19 रोजी स्वयंघोषित बंद पाळण्यात येणार असून जिह्यातील बागलकोट, मुधोळ, जमखंडी, बेळगी, बदामी, हुनगुंद, रबकवी बनहट्टी, तेरदाळ, इलकल आधी तालुक्यातून शांततेत मोर्चे काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे माजी मंत्री गोविंद कार्जोळ यांनी सांगितले.