लिसेस्टर शहरात दोन समुदायांमध्ये हिंसक झटापट ः धार्मिक स्थळांवर हल्ल्याचा आरोप
वृत्तसंस्था / लिसेस्टर
इंग्लंडमधील लिसेस्टर शहरात हिंदू अन् मुस्लीम समुदायाच्या लोकांमध्ये झटापट झाल्यानंतर तणावाची स्थिती आहे. 28 ऑगस्ट रोजी दुबईत आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याची पार्श्वभूमी या तणावामागे कारणीभूत आहे. दोन दिवसांपूर्वी शहराच्या पूर्व भागात दोन्ही समुदायांमधील संघर्षानंतर वातावरण अधिकच बिघडले आहे. शांततेचे आवाहन करण्यासह पोलीस समाजकंटकांच्या विरोधात कारवाई करत आहेत. आतापर्यंत 20 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही समुदायाच्या लोकांनी परस्परांवर हल्ल्याचा आणि मोर्चा काढल्याचा आरोप केला आहे. बहुतांश निदर्शने बेलग्रेव्ह रोडवर झाली असून या भागात भारतीय आणि पाकिस्तानी वंशाच्या लोकांची अनेक रेस्टॉरंट्स आहेत.
पोलिसांनी सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत डिस्पर्सल ऑर्डर जारी केला होता. याच्या अंतर्गत कुणालाही रोखून चौकशी करण्याचा अधिकार पोलिसांना आहे. 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलामुलींना घरातच राहण्यास सांगण्यात आले आहे.
28 ऑगस्ट रोजीच्या भारत-पाक सामन्यानंतरही शहराच्या बेलग्रेव्ह भागातील मेल्टन रोडवर हिंसा झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी 8 जणांना अटक केली होती. त्यानंतरही झटापट होण्याचे प्रकार सुरूच होते. पोलिसांनी आता आणखी 19 जणांना अटक केली आहे. पोलीस अधिकारी रॉब निक्सन यांच्यानुसार कारवाई सुरूच राहणार आहे.
विनाअनुमती निदर्शने, दगडफेकीचा प्रकार
विना अनुमती निदर्शने झाल्यावर पोलिसांनी रविवारी शहरातील बेलग्रेव्ह रोड बंद केला. तेथे मोठय़ा संख्येत पोलीस तैनात करण्यात आले आहेत. शनिवारी रात्री अनेकदा दोन्ही गटांमध्ये झटापट झाली होती. दोन्ही बाजूंनी परस्परांवर दगड तसेच काचेच्या बाटल्यांचा मारा करण्यात आला आहे. वाहनांची तोडफोड करण्यासह अनेक ठिकाणी मारहाणीचे प्रकार घडले आहेत. या हिंसेनंतर सामुदायिक नेत्यांनी शांततेचे आवाहन केले आहे. रविवारी रात्री देखील निदर्शक रस्त्यांवर ठाण मांडून होते. स्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी जमावाला अनेकदा पांगविले.
लोकांमध्ये भीतीचे वातावरण
भारत-पाकिस्तान सामन्यापासून येथील तणावामुळे कामकाज अन् व्यापार बंद आहे. तणावामुळे ग्राहक फिरकत नाहीत. हिंसेमुळे लोक घरातून बाहेर पडत नसल्याचे एका हॉटेल व्यावसायिकाने सांगितले. मंदिरांवर हल्ले झाले असून धार्मिक ध्वज फाडण्यात आल्याचा आरोप हिंदू समुदायाच्या लोकांनी केला. तर पोलिसांनी याची पुष्टी दिलेली नाही. मुस्लिमांची मोठी लोकसंख्या असलेल्या बर्मिंगहॅम शहरातून काही गट लिस्टेटरमध्ये येत असल्याचा दावा हिंदू समुहांकडून करण्यात आला. सप्टेंबरच्या प्रारंभी पाकिस्तानी वंशाच्या लोकांनी हल्ले केले होते.
खासदाराकडून शांततेचे आवाहन
खासदार क्लॉडिया वेब यांनी सोशल मीडियाद्वारे लोकांना शांततेचे आवाहन केले आहे. ही वेळ डोकं शांत ठेवण्याची आहे. सर्वांनी घरी परतावे अशी विनंती करते. आम्ही सामुदायिक संबंध मजबूत करण्यासाठी आम्ही चर्चा सुरू करू इच्छितो. तुमच्या कुटुंबाला तुमची काळजी वाटत असणार. पोलीस तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत असून त्यांचा सल्ल माना असे खासदारांनी म्हटले आहे.
लिसेस्टरमध्ये भारतीय वंशाचे 1 लाख लोक
शहराची लोकसंख्या 3.30 लाख
भारतीय वंशाचे 1 लाख
पाकिस्तानी वंशाचे 8 हजार
धर्मनिहाय
हिंदू 50 हजार
मुस्लीम 61 हजार
शीख 15 हजार